पालघरः भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे;परंतु त्यांच्यापुढे या वेळी जिजाऊ सामाजिक संघटनेच्या नीलेश सांबरे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. पाटील यांची हॅट्रिक रोखून सांबरे ‘जायंट किलर’ ठरणार का, हे त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळते का, यावर ठरणार आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर २०१४ पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. २०१४ मध्ये मात्र पाटील यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. नंतर त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले. २००९ मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश टावरे निवडून गेले होते. त्यानंतर मात्र राजकीय परिस्थिती बदलली. भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या आत्ताच्या परिस्थितीचा विचार केला, तर या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे आमदार आहेत, तर भिवंडी पूर्व या एकाच मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षाचा या मतदारसंघातून एकही आमदार नाही. अशा परिस्थितीत पाटील यांची राजकीय ताकद कितीही मोठी असली, तरी त्यांना पराभूत करण्यासाठी तेवढा समर्थ उमेदवार महाविकास आघाडीकडे नाही.
महाविकास आघाडीत मतदारसंघावरून रस्सीखेच
या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून पालघर, भिवंडी लोकसभा मतदारसंघातून आपल्या सामाजिक कामाच्या जोरावर मोठे नेटवर्क उभे केलेल्या सांबरे यांचे मोठे आव्हान पाटील यांच्यापुढे उभे राहू शकते. हा मतदारसंघ काँग्रेसचा असला, तरी त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने दावा केला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केलेल्या सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पवार यांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे; परंतु काँग्रेस मात्र कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघावरचा दावा सोडायला तयार नाही.
सांबरेंना काँग्रेसची पसंती
काँग्रेसकडे दुसरा तगडा उमेदवार नसल्याने सांबरे यांना उमेदवारी देण्याचे संकेत काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून मिळत आहेत. पाटील यांची राजकीय ताकद कितीही मोठी असली तरी सांबरे मात्र त्यांना चांगले आव्हान देऊ शकतात. सांबरे यांनी शिक्षण, आरोग्य, सामाजिक काम, महिला सशक्तिकरण अशा माध्यमातून तळागाळापर्यंत आपले राजकीय नेटवर्क तयार केले आहे. त्यांच्या समर्थकांनी फार पूर्वीच मतदारसंघ पिंजून काढला आहे.
सांबरे यांची राजकीय ताकदही मोठी
गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकांत सांबरे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. पालघर जिल्हा परिषदेत त्यांचा गट सत्तेत सहभागी आहे. विक्रमगड नगरपालिकेत त्यांनी सर्वच्या सर्व जागा जिंकून आपली राजकीय ताकद काय आहे हे दाखवून दिले आहे. जिजाऊ अर्बन बँकेत त्यांची सत्ता आहे याशिवाय वेगवेगळ्या उपक्रमातून ते सातत्याने जनतेत असतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका खासगी सर्वेक्षणातून भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सांबरे विजय होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसलाही सांबरे यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराची आवश्यकता आहे.
‘जायंट किलर’ ठरण्याची शक्यता
या पार्श्वभूमीवर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाच्या वाट्याला येतो, यावर पाटील यांची हॅट्रिक रोखली जाते का, हे ठरणार असून सांबरे उमेदवार असतील, तर ते या मतदारसंघातून ‘जायंट किलर’ ठरतील, असा सार्वत्रिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.