पालघरः पालघर जिल्ह्याच्या निवडणुकीच्या इतिहासात खा. राजेंद्र गावित हे नाव कायम चर्चेत असते. गेल्या दोन दशकांत एकही निवडणूक अशी नाही, की ज्यात गावित यांचे नाव नाही. एका रात्रीत पक्ष बदलून निवडून येणार नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे.
राजेंद्र गावित हे मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील असले, तरी त्यांची कर्मभूमी ही पालघर जिल्हा आहे. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी आपल्या चळवळ्या स्वभावाचा परिचय करून दिला. वेगवेगळ्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. त्यांचे घराणे काँग्रेसचे असल्यामुळे स्वाभवीकच त्यांचा ओढाही काँग्रेसकडे होता. विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसने अचानक गावित यांना उमेदवारी दिली. अशा परिस्थितीत गावित यांनी चांगली लढत दिली. त्यांचा पहिल्याच निवडणुकीत पराभव झाला, तरी त्यांना मिळालेली मते मात्र दखलपात्र होती.
उमेद न सोडलेले आणि उन्माद नसलेले नेते
पराभवाने खचून जायचे नाही आणि विजयाने उन्मादी व्हायचे नाही, या वृत्तीने त्यांनी आपले पाय आतापर्यंत कायम जमिनीवर ठेवले. २००९ च्या च्या निवडणुकीत गावित यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला. मातब्बर नेत्या मनीषा निमकर यांचा त्यांनी पराभव केला. पहिल्यांदाच आमदार होऊन त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली. पालघर जिल्ह्याची निर्मिती तसेच पालघर जिल्ह्यातील अनेक वीविध विकास कामांशी त्यांचा या ना त्या कारणाने संबंध आला आहे.
टीकेला कामातून उत्तर
खा. गावित यांच्यावर जरी बाहेरचा उमेदवार म्हणून कायम टीका केली जात असली, तरी त्यांनी आपल्या कामातून आतापर्यंत तीनदा स्थानिक उमेदवारांचा पराभव केला हे विसरता येणार नाही. टीकेला कामातून उत्तर देण्यावर त्यांचा भर असतो. विधानसभेच्या तीन निवडणुका त्यांनी लढवल्या, त्यापैकी दोन निवडणुकात त्यांचा पराभव झाला, तर एक निवडणूक ते जिंकले. लोकसभेच्या दोन निवडणुका ते जिंकले. त्यातली एक निवडणूक पोटनिवडणूक होती. भारतीय जनता पक्षाने त्यांना २०१८ च्या पोटनिवडणुकीत संधी दिली. काँग्रेसमधून भाजपत येऊन ते खासदार झाले.
तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी
एक वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीच्या वेळी हा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला सुटला. त्यामुळे गावित यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला आणि या मतदारसंघातून पुन्हा विजय मिळवला. आता गावित हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. महायुतीत पालघर लोकसभा मतदारसंघ नेमका कोणाला याचा निर्णय अद्याप झाला नसला, तरी चर्चा मात्र गावित यांच्या नावाभोवतीच फिरते आहे.
चर्चा गावितांच्याच नावाभोवती
हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाट्याला असला, तरी भारतीय जनता पक्षाचा या मतदारसंघावर दावा आहे. जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपला जाण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाकडे या मतदारसंघातून अनेक लोक इच्छुक असले, तरी प्रत्यक्षात भाजप गावित यांना शिंदे सेनेतून आपल्याकडे घेऊन उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावित यांच्या नावाशिवाय पालघर लोकसभा मतदारसंघाची चर्चा पूर्ण होत नाही, असा गेल्या दोन दशकातला जो अनुभव आहे, तोच या वेळी येतो आहे. गावित यांना उमेदवारी मिळाली, तरी आता या मतदारसंघात चौरंगी लढत अपरिहार्य असून भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसेनेच्या एकजुटीवर गावित यांचे भवितव्य अवलंबून आहे.