निर्ढावलेल्या सिटी सर्व्हे व भुमी अभिलेखवाल्यांचे काहीच वाकडे होत नाही!
शहर व जिल्ह्यातील सिटी सर्व्हे अर्थात भुमी अभिलेख विभाग सतत वादाच्या भोवर्यात राहात आहे. या विभागाची गेल्या काही वर्षात इतकी भयानक लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत, तरी लाचखोरी शिवाय कामच करावयाचे नाही, हे ब्रिदवाक्य सोडायला ही मंडळी काही तयार नाहीत. यांच्या खुल्या व अत्यंत बेशर्म लाचखोरीची हद्द कुठपर्यंत वाढावी याला सीमा नाही!
सिटी सर्व्हे वाल्यांनी भरपूर पैसे खाण्यासाठी एक फार मोठी युक्ती शोधून काढली आहे. नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्डांचे संगणकीकरण झाले, तेव्हा त्यांनी ठरवून हजारो नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्डांची संगणकात नोंदणी करताना मुद्दाम क्षेत्राचे चुकीचे आकडे, चुकीची नावे वगैरे टाकून घोळ करून ठेवले आहेत. आता नागरिक काही कामानिमित्त उतारा काढावयास गेले, की या चुकीच्या नोंदीचा उतारा त्यांना मिळतो. यापुढे जाऊन यांची बेशर्मी इतकी, की आताही मुद्दाम चुका करून उतारे देतात. चुकीच्या नोंदीच्या उताऱ्यामुळे पुढे नागरिकाचे काम अडते. मग तो नाव – क्षेत्र आदी चुकांच्या दुरस्तीसाठी चकरा मारतो. वैतागतो. नंतर परेशान होवून देणे घेणे करण्यस तयार होतो. उतार्यावर नोंदी चुकीच्या केल्या. चुक सिटीसर्व्हे ऑफिसची. भुर्दंड मात्र नागरिकांना. दुकानदारी सिटी सर्व्हेच्या अधिकाऱ्यांची! आमचे एक व्यापारी मित्र होते. त्यांना चुकीच्या नावाचा उतारा दिला होता. चकरा मारून मारून थकले. काम होईना. साहेबांचा खाजगी पंटर म्हटला दहा हजार द्या! आम्ही व्यापारी मित्राला सांगितले. पैसे देवू नका, अर्ज द्या! “उतार्यावर चुकीची नोंद करणारा कर्मचारी व ती नोंद कायम करणारा अधिकारी यांनी कर्तव्यात कसुरी केली आहे. सिटी सर्व्हेची प्रतिमा मलिन केली आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी करा. त्यांना खाते अंतर्गत शिक्षा करा व त्यांच्या सर्व्हिस बुकला लाल शेऱ्यात नोंद घ्या! त्याने तसे केले, “काय झाले? त्या खाजगी एजंटाने पैसे मागण्या ऐवजी भाउ तुमचा दुरुस्त उतारा घेवून जा, म्हणून व्यापारी मित्राला फोन केला!
असेच एक प्रकरणात अहिल्यानगर भूमी अभिलेख कार्यालयात एका नागरिकाने माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, तर त्याला दुसरे अपील केल्यावर उत्तर मिळाले की, संबंधित मागितलेली माहितीचे कागदपत्र हरवले आहे. तेव्हा त्यांनी संबंधित विभागाकडे सतत पाठपुरावा केला. तेव्हा नाशिक चे माहिती आयुक्तांनी अहिल्यानगर च्या भूमी अभिलेख कार्यालयाला आदेश दिला की, संबंधित कागदपत्रे चोरी गेले आहेत त्याबद्दल स्थानिक पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करून अहवाल पाठवावा. वरिष्ठांनी आदेश दिल्यावर चार वर्षांनी या विभागाने कोतवाली पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल केला, आता गुन्हा दाखल होऊन जवळपास तीन वर्ष झाले तपास ठप्प आहे. सदर गुन्ह्यात पोलिस तपासाचे काम करतील अशी अपेक्षा आहे, परंतु नगर भूमी अभिलेख कार्यालयातून चोरी गेलेल्या महत्वाच्या कागदपत्रांसाठी कार्यालयीन तपास म्हणून अद्याप पर्यंत कोणतीही समिती नेमली गेलेली नाही, कार्यालयीन चौकशी नाही किंवा कोणावर जबाबदारी चा ठपका ठेऊन निलंबितही केले गेले नाही. याबाबत आत्तापर्यंत चे सर्व भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक व कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यास नक्कीच बीड – बिहार ला लाजवेल असे भ्रष्टाचाराचे प्रकरणे बाहेर येतील असे येथील कर्मचारी व एजंट खाजगीत बोलत आहे. परंतु कोणतीही कारवाई होणार नाही, कारण या साखळीमध्ये सगळेच अडकण्याची शक्यता आहे. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रकरणात सिटी सर्व्हेवाल्यांनी फुकटात हे कांड केले असेल काय? जिज्ञासूंनी शोध घ्यावा, असे हे प्रकरण आहे.
सिटी सर्व्हे व भुमी अभिलेखच्या एकाहून एक सुरस व चमत्कारिक कथा आहेत. आता महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे जिल्हा भुमी अभिलेख कार्यालय व हवेली तालुका उपअधीक्षक कार्यालय यांच्या कारभाराच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमली आहे. पैसे घेतल्या शिवाय काम न करणे, मोजण्यात अनियमितता, मोजणी तारखांत परस्पर बदल करणे, अपिलांचे निकाल फिरविणे, चौकशीत टाळाटाळ, तक्रारींची दखल न घेणे, नागरिकांशी अरेरावीत बोलणे, अनियमितता अशा तेथे कितीतरी तक्रारी होत्या. प्रभारी अपर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांना मंत्र्यांनी हे चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यातून फारसे काही परिणाम बाहेर येतील, अशी अपेक्षा नागरिकांनी करू नये. कारण खालपासून वरपर्यंत ही सर्व यंत्रणा सडलेली आहे. आज पर्यंतचा विविध शासकीय खात्यांमधील अनुभव तर हाच आहे. पुणे हवेलीत ज्या काही तक्रारी आहेत त्या प्रातिनिधीक आहेत. कमी अधिक फरकाने अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्हे व राज्यभरातच भुमी अभिलेख – सिटी सर्व्हे कार्यालयांची यंत्रणा पार सडून गेली आहे – कुजून गेली आहे. आपले काहीच वाकडे होत नाही म्हटल्यावर आता ते इतके डोक्यावर चढले आहेत, की त्यांच्या दुकानदारीत त्यांच्याच खात्यातल्या निवृत्त अधिकाऱ्यास देखील सुट सवलत नाही. त्यातून हे किती निर्ढावलेले झालेले आहेत, याचा अंदाज कुणीही नागरिक बांधू शकतो.
आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा भारत पवार 8329405191