नगर महापालिकेत कोणाचाच कोणाला राहिलेला नाही ताळमेळ; मुदत संपूनदेखील कंत्राटी स्वच्छता निरीक्षक कामावर हजरच कसा? ‘आंधळं दळतंय आन् कुत्रं पीठ खातंय’…! नगरकरदेखील वैतागलेत या प्रकाराला!
प्रचंड सावळा गोंधळ, केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रताप आणि कोण काय करतंय, याविषयी कसलीच चौकशी न करता एकमेकांच्या चुकांवर पांघरुन घालत फक्त आणि फक्त सारवासारव करण्याचा प्रयत्न जर कुठं होत असेल तर ते ठिकाण म्हणजे अहिल्यानगरची (अहमदनगर) महानगरपालिका होय. या महानगरपालिकेचा सध्या कोणाचाच कोणाला ताळमेळ राहिलेला नाही. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत असलेला एक कंत्राटी स्वच्छता निरीक्षक त्याच्या कॉन्ट्रॅक्टची मुदत संपली तरी आज (दि. 1) सावेडी आरोग्य विभागात चक्क मस्टरवर सही करुन कामावर हजर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या संदर्भात ‘महासत्ता भारत’ वेब न्यूज नेटवर्कच्या टीमनं नगर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पंकज जावळे वगळता जवळपास सर्वच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता वेगवेगळी माहिती देण्यात आली. मात्र ‘महासत्ता भारत’नं सातत्यानं पाठपुरावा करुन कंत्राटी स्वच्छता निरीक्षक सावेडी आरोग्य विभागात आज (दि. 1) कामावर हजर असल्याची अधिकृत माहिती अखेर मिळवलीच.
यासंदर्भात सुरुवातीला उपायुक्त (कर विभाग) यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं, की संबंधित कंत्राटी स्वच्छता निरीक्षकाच्या मुदतवाढी संदर्भात प्रस्ताव तयार करुन तो आयुक्तांना सादर केला होता. मात्र त्यांनी तो अमान्य केला. त्यामुळे सदर कंत्राटी स्वच्छता निरीक्षक सध्या कामावर नाही.
त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त पदावर काम करत असलेल्या अधिकाऱ्याला विचारलं असता त्या अधिकाऱ्यानं सांगितलं, की मी आयुक्त साहेबांसमोर आहे. त्या कंत्राटी स्वच्छता निरीक्षकाला मुदतवाढ देण्यात आली की नाही, हे मला पाहावं लागणार आहे. याविषयी मला काहीही सांगता येणार नाही.
आस्थापना विभाग प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या अधिकाऱ्याला विचारलं असता त्या अधिकाऱ्यानं सांगितलं, की हा विषय घनकचरा आणि आरोग्य विभागाचा आहे. आमच्या अखत्यारित येत नाही. मात्र संबंधित कंत्राटी स्वच्छता निरीक्षकाच्या मुदतवाढीचा कुठलाही प्रस्ताव आमच्यापर्यंत आलेला नाही.
दरम्यान, सावेडी घनकचरा विभाग प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याला विचारलं असता त्यानं सांगितलं, की आज (दि. 1) सकाळी सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली असून संबंधित कंत्राटी स्वच्छता निरीक्षक हजेरी मस्टरवर सही करुन आज कामावर हजर आहे.
वास्तविक पाहता एखाद्या कंत्राटी स्वच्छता निरीक्षकाला त्याच्या कॉन्ट्रॅक्टची मुदत संपल्यानंतर आयुक्तांच्या सहीनं मुदतवाढ द्यावी लागते. तत्पूर्वी तसा प्रस्ताव तयार करून तो आयुक्तांकडे पाठवावा लागतो. मात्र असा प्रस्ताव नगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त पंकज जावळे यांनी यापूर्वीच अमान्य केलेला आहे, अशी माहिती उपायुक्त (कर) यांनीच आम्हाला दिलेली आहे. असं असतानादेखील हा कंत्राटी स्वच्छता निरीक्षक कामावर हजर राहतोच कसा, हा महत्वाचा प्रश्न आहे.
या कंत्राटी स्वच्छता निरीक्षकाला पायघड्या घालणारा ‘तो’ अधिकारी कोण? – नगर महापालिकेकडे तब्बल 17 एस आय म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर अर्थात स्वच्छता निरीक्षक कार्यरत आहेत. असं असताना नेमकं कंत्राटी स्वच्छता निरीक्षकाच्याच खांद्यावर ही जबाबदारी का देण्यात आली? या कंत्राटी स्वच्छता निरीक्षकाला 2021 ते 2024 पर्यंत वेळोवेळी मुदतवाढ का देण्यात आली? या कंत्राटी स्वच्छता निरीक्षकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोट्यवधी रुपयांची बिलं तर वसूल केली जात नाहीत ना? खरं तर या कंत्राटी स्वच्छता निरीक्षकाला घनकचरा विभागात पायघड्या घालणारा तो अधिकारी नक्की कोण, याचा शोध आयुक्त तथा प्रशासक पंकज जावळे हे घेतील का? की तो शोधदेखील ‘महासत्ता भारत’लाच घ्यावा लागेल?
नगरकरांनो! उघडा डोळे पहा नीट…! – नगर महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर नगरकरांच्या कोट्यवधी रुपयांच्या करांमधून खर्च केला जात आहेत. याबरोबरच अनेक कंत्राटी कामगार आणि कंत्राटी स्वच्छता निरीक्षकदेखील या महापालिकेत कार्यरत आहेत. या सर्वांच्या पगारावरच या महापालिकेच्या उत्पन्नातला मोठा आर्थिक भार खर्च होतो. हा पैसा नगरकरांच्या कष्टाचा आणि घामाचा पैसा आहे. त्यामुळे या पैशांचा योग्य विनियोग होतो की नाही, हे पाहण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने नगरकरांवरच आहे. त्यामुळे हे सांगावसं वाटतं, की नगरकरांनो, उघडा डोळे पहा नीट.