लोकसभा निवडणुकीतल्या सात टप्प्यांपैकी चौथ्या टप्प्यातलं मतदान आज (दि. १३) पार पडलं. साधारणपणे नगर दक्षिणेत सरासरी 55.25% पर्यंत मतदान झालं. तर उत्तर अर्थात शिर्डी मतदारसंघात तीच परिस्थिती राहिली. दक्षिण मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी चांगलंच आव्हान दिलंय. या मतदारसंघात विखे आणि लंके यांच्यात चांगलीच चुरस झाल्याचं पाहायला मिळालं. या मतदारसंघात खासदार विखे यांचे पारडं किंचित जड असल्याचं जाणवतंय.
आज झालेल्या निवडणुकीत राज्यातल्या नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर आणि शिर्डी या 11 मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडली.
हा चौथा टप्पा सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. 2019 मध्ये ज्यावेळेस लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी 11 जागांपैकी नऊ जागा महायुतीनं जिंकल्या होत्या. भाजपाला सहा जागांवर विजय मिळवला होता. महाविकास आघाडीला अवघी एकच जागा मिळाली होती तर एका जागेवर एमआयएमचा उमेदवार निवडून आला होता.
देशातली इंडिया विकासासाठी आणि महाराष्ट्रातली महाविकास आघाडी ही भाजपचा पराभव करून जास्तीत जास्त जागा जिंकून घेते का, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. आज झालेल्या मतदान प्रक्रियेत नंदूरबारमधून
भाजपच्या हिना गावित आणि काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यात अटीतटीची लढत झाली. 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून हिना गावित विजय झाल्या होत्या. आता या मतदारसंघात प्रियांका गांधी यांची सभा झाल्यामुळे काँग्रेससाठी चांगलं वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे खानदेशातल्या नंदूरबार मतदारसंघातून काँग्रेसला झुकतं माप मिळण्याची शक्यता आहे.
जळगावमध्ये भाजपाच्या स्मिता वाघ आणि भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले करण पवार यांच्यात लढत झाली. या मतदारसंघात महाविकासाकडे आणि ठाकरे गटाची मदार पक्षांतरावर होती. मात्र या मतदारसंघात माहितीचा प्रभाव आहे. या प्रभावाचा फायदा भाजपच्या स्मिता वाघ यांना होण्याची शक्यता आहे.
रावेर मतदारसंघात भाजपचे रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये खडसे यांचं पारडं जड दिसत आहे. जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांना काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी मोठे आव्हान दिलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा या मतदारसंघावर प्रभाव होता. प्रदीर्घ अनुभव आणि भाजप तसंच महाविकास आघाडीची ताकद या जमेच्या बाजू असल्यानौ रावसाहेब दानवे यांचा विजय इथं निश्चित मानला जात आहे.
आज झालेल्या मतदान प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना शिंदे गटाचे संदिपान भुमरे यांच्यात लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांचं पारड जड असल्याचे दिसत आहे.
शिरूर मतदार संघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे फुटलेले दोन्ही गट आमने-सामने होते. डॉ. कोल्हे यांचे पारडं या ठिकाणी जड असल्याचे पाहायला मिळत आहे. मावळ मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत रंगली. या मतदारसंघात श्रीरंग बारणे यांचा अनुभव संजय वाघेरे यांच्यावर भारी पडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात आज झालेली लढत भाजपासाठी प्रतिष्ठेची होती. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आणि वंचित महाविकास आघाडीचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत झाल्याचे पाहायला मिळालं. या मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ हे सुरवातीपासून आघाडीवर असल्याचे पाहायला मिळालं.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळाली. शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, ठाकरे गटाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि उत्कर्षा रुपवते यांच्यात तिरंगी लढत झाली. रुपवते यांच्यामुळे या मतदारसंघात मतविभागणी झाली असून शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा विजय होण्याची शक्यता आहे.
बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी प्रचंड लक्षवेधी ठरली होती. भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली. मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग या निवडणुकीच्या लढतीत पाहायला मिळाला. मराठा आरक्षणाचा मुंडे यांना फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या मतदारसंघात बजरंग सोनवणे बाजी मारू शकतात, अशी शक्यता आहे.