नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्याचा तपास थंडावला असल्याचा आरोप ठेवीदारांमधून केला जात आहे. असं जर सुरुच राहिलं तर फरार संचालकांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार, आम्हाला आमच्या ठेवी कशा मिळणार, अशा प्रकारचे सवाल उपस्थित करत ठेवीदारांनी आज (दि. 4) नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांची भेट घेत त्यांच्यासमोर थंडावलेल्या पोलीस तपासाविषयी तक्रारी केल्या. यावेळी पोलीस अधिकारी आणि ठेवीदारांमध्ये काही वेळ शाब्दिक चकमकदेखील झाली. दरम्यान, नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासाविषयी ज्या शंका उपस्थित केल्या जात आहेत, त्यातून नगर जिल्हा पोलीस दलाची बदनामी होत आहे. त्यामुळे काहीही झालं तरी या तपासाला गती द्या, अशी तंबी आयजी बी. जी. शेखर पाटील यांनी नगरच्या पोलिसांना यावेळी दिली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे डी. वाय. एस. पी. अमोल भारती उपस्थित होते. तर ठेवीदारांच्या वतीनं
भाजपा जेष्ठ नेते सदाशिव देवगावकर,
सीए राजेंद्र काळे, सरचिटणीस नगर जिल्हा भाजपा ॲड. अच्युत पिंगळे जेष्ठ नेते राष्ट्रीय स्वयं सेवक संघ
दिनकर देशमुख, विलास कुलकर्णी आणि महिला प्रतिनिधी तसंच ठेवीदार उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत ठेवीदारांनी असे प्रश्न उपस्थित केले, की नगर पोलीस दलाला नगर अर्बन बँकेच्या या आर्थिक घोटाळ्यातल्या फरार संचालकांविषयी माहिती आहे. मात्र तरीही त्यांना फरार आरोपी का सापडत नाहीत? हे असंच जर संथगतीनं सुरु राहिलं तर ठेवीदारांच्या ठेवी कशा मिळणार? फरार संचालकांच्या मालमत्ता कधी जप्त होणार?
यावेळी आयजी बी. जी. शेखर पाटील यांनी एस. पी. राकेश ओला यांना नक्की काय अडचणी आहेत, असं विचारलं असता ते म्हणाले, ‘पोलीस दलासमोर आर्थिक फसवणुकीची अशी अनेक प्रकरणं आहेत. मनुष्यबळ कमी आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास उघडकीस आणण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे. या घोटाळ्याचा तपास ज्यांच्याकडे आहे, त्या शहर डीवायएसपी अमोल भारती यांच्याकडे नगर शहराचा पदभार असून आर्थिक गुन्हे शाखेचादेखील त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे वेळ लागत आहे’. मात्र अशा परिस्थितीतही प्रतिकूलतेवर मात करत नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासाला गती द्या, फरार संचालकांना अटक करा, असे आदेश आयजी बी. जी. शेखर पाटील यांनी यावेळी दिले.