नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्याचा तपास योग्य पद्धतीनं सुरु आहे. हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे त्यावर जास्त भाष्य करणं योग्य ठरणार नाही. मात्र या गुन्ह्याचा तपास कुठल्याही यंत्रणेकडे देण्याची आवश्यकता नाही, असं स्पष्टीकरण अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ‘महासत्ता भारत’ वेब न्युज नेटवर्कशी बोलताना दिलं आहे.
ते म्हणाले, ‘थोडा वेळ लागेल. मात्र गुन्हेगार कितीही मोठा असला तरी कोणाचीही गय केली जाणार नाही. नगर जिल्हा क्षेत्रफळानं मोठा आहे. पोलिसांवर लोकसभा निवडणुकीचा ताण आहे. त्याबरोबरच गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचंदेखील पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
राज्यात सर्वाधिक मोठं क्षेत्रफळ असलेल्या जिल्ह्याच्या मानानं मनुष्यबळ थोडंसं कमी आहे. मात्र अशा परिस्थितीतही नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्याचा तपास योग्य पद्धतीनं सुरु आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हेगारांचा कसून शोध घेतला जात आहे’.
दरम्यान, उद्या (दि. 3) या आर्थिक घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय असलेले माजी नगरसेवक सुवेंद्र दिलीप गांधी यांना भादंवि कलम 138 या ‘चेक बाऊन्स’ प्रकरणात नवीदिल्लीच्या कोर्टात समक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचे जे तपास अधिकारी आहेत, त्यांना सुवेंद्र गांधी आणि फर्निचर घोटाळ्यातला मुख्य संशयित शैलेश मुनोत हे दोघेही सापडत नाहीत, याबद्दल नगर अर्बन बँकेचे माजी संचालक आणि बँक बचाव समितीचे संस्थापक राजेंद्र गांधी यांनी ‘महासत्ता भारत’शी बोलताना खंत व्यक्त केली.