पालघरः पालघर नगरपालिकेचे २००९ पासून नगरसेवक असलेल्या अमोल पाटील यांनी दहा वर्षात कामाचा डोंगर उभा केला आहे. सरकारी निधीतून विकास कामांसाठी ३५ कोटी रुपये मिळवून देणारे ते एकमेव नगरसेवक आहेत. त्यांच्या या विकासकामामुळे तसेच विविध सामाजिक कामामुळे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
पालघर नगरपालिका स्थापन झाल्यानंतर अल्याळी या परिसरातून एकही नागरिक नगरपालिकेला उभा राहत नव्हता. अल्याळी परिसराची लोकसंख्या कमी असल्याने या प्रभागातून निवडणुकीला कुणीच उभे राहत नव्हते. त्यापूर्वी या भागातून उभे राहिलेल्यांचा पराभव झाला होता.
कमी लोकसंख्या असूनही विजय
या भागातून नगरपालिकेच्या निवडणुकीत न उतरण्याची एक मानसिकता तयार झाली होती. या मानसिकतेला छेद देत अमोल पाटील यांनी २००९ मध्ये नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि ते निवडून आले. एखाद्या भागाची लोकसंख्या कमी असली, तरी लोकांना विश्वासात घेतले आणि काम करण्याचा विश्वास दाखवला, तर निवडून येता येते, हे त्यांनी दाखवून दिले. अल्याळी भागाचा पहिला लोकप्रतिनिधी पालघर नगरपालिकेत पोचला. बहुजन विकास आघाडीकडून ते नगरसेवक झाले होते.
हिंदवी मैदानाचा विकास
नगरपालिकेच्या आरोग्य, बांधकाम व अन्य समित्यांचे कामकाज पाहताना त्यांनी विकासकामांवर भर दिला. केवळ प्रभागापुरता मर्यादित दृष्टिकोन न ठेवता शहराच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी अनेक कामे मार्गी लावली. त्यात हिंदवी मैदान या मोठ्या क्रीडांगणाचा समावेश आहे. व्यायामशाळेची इमारत जरी नगरपालिकेने बांधून दिली असली, तरी त्यासाठीचे साहित्य कुठून उपलब्ध करायचे हा प्रश्न होता. पाटील यांनी स्वखर्चातून नगरपालिकेच्या व्यायामशाळेत मुलांना खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध करून दिले.
लघु पाणी योजनांतून घरोघर पाणी
अल्याळी परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर होता. नगरपालिका पाणीपुरवठा करत होती, तरीही सांडपाणी व अन्य पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार होती. त्यासाठी अमोल पाटील यांनी पुढाकार घेतला आणि प्रत्येक वाड्या, पाड्यापर्यंत घराघरापर्यंत कूपनलिकेचे पाणी नळाद्वारे पुरवण्यात आले. त्यामुळे या भागाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला.
दुसऱ्याला संधी देऊन निवडून आणले
एकदा निवडून आले की पुन्हा आपल्यालाच ते पद पाहिजे, अशी मानसिकता असते. आपल्याला नाही, तर आपल्या कुटुंबतील कुणाला तरी संधी मिळावी, असा प्रयत्न असतो; परंतु त्याला अमोल पाटील अपवाद आहेत. त्यांनी २०१४ च्या निवडणुकीला उभे न राहता दुसऱ्याला निवडून आणले. २०१९ मध्ये त्यांनी प्रभाग बदलला आणि त्या ठिकाणाहून ते पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले.
लोकोपयोगी कामांवर भर
विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी विविध कामे मार्गी लावली. त्याचबरोबर वडिलोपार्जित शेती ही जपली. राजकारणाचे बाळकडू त्यांना कुटुंबातून मिळाले. गेल्या पंधरा वर्षापासून ते शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. गेल्या काही वर्षांपासून क्रीडांगण, तलाव सुशोभीकरण, समाज मंदिर, कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना रस्ते, गटार, सार्वजनिक शौचालय, बाल उद्यान, नाना-नानी पार्क आदी लोकोपयोगी कामे त्यांनी केली.
सोमवंशी पाठारे समाजोन्नती संघाचा पुरस्कार
राजकारणाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून ते विविध कामे करत असतात. त्यात विद्यार्थ्यांना वह्या वाटप, शिवजयंती सोहळा, दिवाळी नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन आदी सामाजिक कामामुळे त्यांना गेल्या वर्षी सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या वतीने पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. केवळ आपल्याला जनतेची सेवा करता येते, याबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांच्या या सामाजिक कामाबद्दल त्यांचा विविध संघटना, समाज, संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.