नगरच्या सिटी सर्वे कार्यालयातली महत्वाची कागदपत्रं सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वी गहाळ झाल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात या कार्यालयाकडून फक्त नावालाच फिर्याद देण्यात आली. मात्र या प्रकरणी सिटी सर्वे कार्यालयातल्या वरिष्ठांनी आतापर्यंत कोणालाच दोषी धरलेलं नाही. कोणत्याच कर्मचाऱ्याविरुद्ध हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली नाही. नगरच्या सिटी सर्वे कार्यालयातल्या बेजबाबदार कारभाराचा हा कळस म्हणावा लागेल.
अशा गंभीर प्रकरणात खरं तर विधानसभेच्या सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडायची गरज आहे. मात्र याकडे कोणाचंच लक्ष नसल्याचं वास्तव समोर येत आहे.
नगरच्या सिटी सर्वे कार्यालयातली कागदपत्रं गहाळ झाल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. मात्र सिटी सर्वे कार्यालयातल्या वरिष्ठांनी फक्त पोलिसांच्याच भरवशावर बसत यासाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्याविरुद्ध अद्यापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही.
नगरच्या सिटी सर्वे कार्यालयामध्ये अनेक प्रकारच्या ‘गडबडी’ सुरु आहेत. या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची प्रत्येक कामासाठी आर्थिक लूट केली जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या कार्यालयाकडे बारकाईनं लक्ष देण्याची मागणी होत आहे.