बारामतीमध्ये ईव्हीएम मशीन्स ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत, त्या स्ट्रॉंग रुममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा काही काळासाठी बंद होता, असा आरोप नुकताच करण्यात आलाय. हा आरोप जुना होतो ना होतो, तोच अहिल्यानगरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीतले महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. वास्तविक पाहता हा गंभीर प्रकार असून कुंपणच शेत खात असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे. नगरच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या शासकीय गोदामात ईव्हीएम मशीन्स ठेवण्यात आल्या. त्या ठिकाणी असलेली त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एक अज्ञात व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा निलेश लंके यांनी केला आहे. अर्थात या दाव्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची भूमिका काय आहे, हे मात्र अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही.