धर्मदाय आयुक्त जर धर्मदाय रुग्णालयाचे वेळेवर ऑडिट करत नसेल तर धर्मदाय आयुक्तांना तेवढेच जबाबदार का धरण्यात येऊ नये..!
धर्मादाय” नावाखाली चालणारा धंदा!
तथाकथित धर्मादाय रुग्णालयांचं काम चालतं तरी कसं? ही रुग्णालये गरीबांची सेवा करत असल्याचं ढोंग करतात, पण प्रत्यक्षात त्यांचा सगळा कारभार फक्त पैशांच्या जोरावर आणि पैशासाठीच चालतो.
या रुग्णालयांना शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अल्प दरात किंवा मोफत जमीन मिळते. काही वेळा ही जमीन देणग्यांतूनही मिळते.
त्यावरचं बांधकामसुद्धा जनतेच्या देणग्यांमधून उभं राहतं. म्हणजे सर्वसामान्य माणसाचा पैसा, भावनांची गुंतवणूक, आणि त्यातही मिळणाऱ्या सरकारी सवलती — चटई क्षेत्रावर सूट, करांमध्ये सूट, गरीब रुग्णांवर उपचारासाठी शासकीय योजनेतील निधी… सगळं मिळूनसुद्धा यांची भूक काही भागत नाही!
ज्या रुग्णांवर अल्प दरात किंवा मोफत उपचार केले असं दाखवलं जातं, त्याचा खर्च सुद्धा विविध सरकारी योजनांमधून वसूल केला जातो. म्हणजे एकच उपचार, दोन ठिकाणी बिलं. आणि या “मोफत” उपचारांच्या नावावर देश-विदेशातून कोट्यवधींच्या देणग्या जमा केल्या जातात. इतकं सगळं करूनही यांची लालसा थांबत नाही. आज अनेक “धर्मादाय” रुग्णालयं प्रत्यक्षात व्यापारी दरानेच उपचार करत असतात.
काही संस्था तर थेट हे रुग्णालय देशी-विदेशी कॉर्पोरेट कंपन्यांना विकून मोकळ्या झाल्या आहेत, किंवा त्यांना चालवण्यासाठी देत आहेत..
हे सगळं थांबवणार कोण आणि कसं ?