मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, यासाठी मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठ महिन्यांपासून जो संघर्ष सुरू केला आहे, तो संघर्ष आता वेगळ्या वळणावर पोहोचलाय. जरांगे पाटलांच्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राजेश टोपे यांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. या आंदोलनाला राजेश टोपे यांनी हे रसद पुरवली असल्याचा आरोपदेखील भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी सांगितलं, की ‘जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला मीदेखील सामोरे गेलो आहे. अंतरवाली सराटीत ज्यावेळी दगडफेक झाली, त्या घटनेत महिलांसह अनेक जण जखमी झाले. त्या सर्वांना वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी एक लोकप्रतिनिधी या नात्यानं जखमींना लवकर हॉस्पिटलमध्ये ॲपडमिट करण्याच्या उद्देशाने मी तिथं गेलो होतो. ज्या कोणाला दवाखान्यात खाटा उपलब्ध होत नव्हत्या, त्या आम्ही मिळवून दिल्या.
दंगली करणं किंवा दगलखोरांना चिथावणी देणं, जाळपोळ करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, अशी समाजविघातक कृत्ये आम्ही कधीच केली नाही आणि यापुढे देखील करणार नाही. आमच्यावर जे आरोप होताहेत, त्या आरोपांत काहीच तथ्य नाही. ते सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेत एक टक्का जरी दोषी आढळलो, तरी जनता मला जे शिक्षा देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे आणि त्यानंतर राजकीय संन्याससुद्धा घ्यायला तयार आहे अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी दिलीय.