दुचाकी आणि चार चाकी वाहनांवर press असं लिहून स्वतःला पत्रकार म्हणविणाऱ्या तोतया पत्रकारांकडून लोकशाहीचा चौथा स्तंभ बदनाम होत आहे. हे तोतया पत्रकार सरकारी अधिकाऱ्यांना ‘ब्लॅकमेल’ करत आहेत. पत्रकारितेचा गैरवापर करणाऱ्या अशा तोतया पत्रकारांविरुध्द कारवाई करण्यासंदर्भात नेवासा प्रेस क्लबच्यावतीनं तहसीलदार संजय बिरादार आणि नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना नुकतंच निवेदन देण्यात आलं.
नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड, गुरुप्रसाद देशपांडे, अशोक डहाळे, सुधीर चव्हाण, कैलास शिंदे, मकरंद देशपांडे, सुहास पठाडे, रमेश शिंदे, पवन गरुड, शंकर नाबदे, नानासाहेब पवार, अभिषेक गाडेकर आदींसह नेवासा शहर आणि तालुक्यातले पत्रकार यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे, की वाहनांवर press असं लिहून सरकारी अधिकाऱ्यांवर ‘इंप्रेशन’ मारण्याचा हे तोतया पत्रकार प्रयत्न करत आहेत. वर्तमानपत्रांसाठी जाहिराती मागत आहेत. जाहिरात न दिल्यास बातमी छापण्याची धमकी देत आहेत.
अशा गैरप्रकारामुळे खऱ्या पत्रकारांची अडचण होत असून निर्भिड, निःपक्षपाती आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यांवर यामुळे खाली पाहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यातल्या अशा तोतया पत्रकारांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.