पालघरः ठाणे-पालघर प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत तीन अपत्य असताना उभे राहून सहकार कायद्याचा भंग केल्याच्या प्रकरणातील पदवीधर शिक्षक प्रकाश मरले यांचा पाय आता आणखीच गाळात रुतत चालला आहे. त्यांना बेकायदेशीर कृत्यात मदत करणाऱ्यांवरही आता कारवाईची शक्यता आहे.
पदवीधर शिक्षक प्रकाश मरले ठाणे-पालघर शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत दोनदा निवडून आले. त्यांना तीन अपत्ये असतानाही त्यांनी ते निवडणूक यंत्रणा आणि सहकार खात्यापासून दडवून ठेवले. त्यांच्या दोनपेक्षा जादा अपत्याबाबत या पतपेढीकडे तसेच जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु त्यांनी दखल घेतली नाही. आता विभागीय सहबिनंधकांसमोरची सुनावणी पूर्ण झाली असून २५ जुलैला विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव या प्रकरणी अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे.
दोन वेगवेगळे दाखले कसे?
सहकार कायद्याच्या १९६० च्या कलमानुसार एक सप्टेंबर २००२ नंतर तिसरे अपत्य झाले असेल, तर अशा व्यक्तीला निवडणुकीला उभे राहता येत नाही. अशी व्यक्ती निवडून आली, तरी त्याचे सदस्यत्व रद्द होते. भालेराव यांच्या समोर तक्रारदारांनी मरले यांच्या तीन अपत्यांचे शाळा सोडल्याचे दाखले आणि त्यांच्या साक्षांकित प्रती सादर केल्या, तर मरले यांनीही दाखले सादर केले. मरले यांनी नऊ जून रोजी धरमपुर ग्रामपंचायतीचा काढलेला अपत्याचा दाखला आणि साक्षांकित प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
कुणाचे दाखले खरे मानणार?
तक्रारदारांनी मरले यांना २००२ नंतर झालेल्या तिसऱ्या अपत्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेले दाखले साक्षांकित करून दिले. याप्रकरणी मरले यांनी एक सप्टेंबर २००२ नंतर आपल्याला कोणतेही अपत्य झाले नसल्याचे सांगून कांगावा केला होता; परंतु त्यांना झालेल्या तिसऱ्या अपत्याचा दाखला त्यांची तिसरी मुलगी ज्या शाळेत शिकते, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनीच दिला आहे. आता मरले यांनी धरमुपर ग्रामपंचायतीतून दिनांक २१ जून २०२४ रोजी दाखला मिळवला आहे सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर पदवीधर शिक्षक प्रकाश मरले यांनी हा दाखला प्राप्त केला असून एकाच आपत्याचे दोन दाखले तयार झाले तरी कसे हा प्रश्न आता उपस्थीत होत असून या प्रकरणात कुणाचे दाखले खरे मानायचे, असा प्रश्न असून, त्यामुळे कुणा एकाने दिलेले दाखले खोटे असल्यामुळे आता या प्रकरणी खोटे दाखले दिल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मरलेसह संबंधितांचे दणाणले धाबे
पूर्वी तक्रारदारांनी सादर केलेली कागदपत्रे अभ्यासासाठी मरले यांनी मागितली होती. आता मरले यांनी दाखल केलेली कागदपत्रे अभ्यासासाठी तक्रारदारांनी मागितली आहेत. त्यामुळे भालेराव यांनी पुढील सुनावणी २५ तारखेला ठेवली आहे. अपत्याच्या जन्म तारखेची शाळा, महाविद्यालय, आधार कार्ड आदी विविध ठिकाणी नोंद असते. आता त्याची पडताळणी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. त्यामुळे मरले यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. तिसऱ्या अपत्याबाबत शाळेचा दाखला, खरा की धरमपूर ग्रामपंचायतीचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. खोटा दाखला देणारी संस्था कोणतीही असली, तरी त्यांच्यावर कारवाईचा मुद्दा तक्रारदार लावून धरणार आहेत तसेच प्रसंगी पोलिस आणि न्यायालयात दाद मागणार असल्याने मरले यांच्याबरोबरच संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
वसुलीचे आदेश होण्याची शक्यता
मरले यांच्या तीनही अपत्याच्या जन्माचे दाखले तक्रारदारांच्या हाती लागले आहेत. भालेराव यांच्याकडे काहींनी थेट पुरावे पाठवले होते. मरले यांनी दोन वेळा संचालक म्हणून निवडून आल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकांना लावलेली हजेरी आणि घेतलेले भत्ते वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या संचालक मंडळाच्या काळात त्यांनी काही आर्थिक फायदे घेतले असतील, तर त्याची चौकशी करण्याची मागणीही तक्रारदारांना स्वतंत्र अर्जाद्वारे करता येईल. विभागीय सहनिबंधक त्यावर वसुलीचे आदेश देऊ शकतात.
अधिकारी-पदाधिकारी अडचणीत
मरले यांना पाठीशी घालणाऱ्या ठाणे-पालघर शिक्षक पतपेढीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांविरोधातही आता तक्रार केली जाण्याची शक्यता आहे. मरले यांना तीन अपत्य असतानाही त्यांना पदावर राहू दिले, सहकार खात्याला कळवले नाही, तसेच त्यांना भत्ते दिले. आर्थिक निर्णयात त्यांना सामावून घेतले. आता या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
‘महासत्ता भारत’चा पाठपुरावा
गेल्या अडीच वर्षांपासूनच्या दडपल्या गेलेल्या या प्रकरणाचा ‘महासत्ता भारत’ने पाठपुरावा केला. ‘महासत्ता भारत’चे पालघरचे विभागीय संपादक योगेश चांदेरकर यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याची चौकशी करणाऱ्या यंत्रणेला दखल घ्यावी लागली आहे. नैतिक दडपण असल्याने विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव या प्रकरणी काय निर्णय देतात, याकडे लक्ष लागले आहे.