पालघरः (योगेश चांदेकर)पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या संचालकपदी निवडून येताना खोटी माहिती दिलेल्या आणि अपत्याची माहिती दडवलेल्या संचालकांना या पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचेही पाठबळ असल्याचे समजते. या शिक्षकाबाबत आलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे विभागीय सहनिबंधक कायार्लयाने ठरवले आहे.
जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रारी होऊनही त्याची चौकशी झाली नाही. तसेच चौकशी झाली असल्याचे सांगितले जात असेल, तर तक्रारदाराचे जाबजबाब का नोंदवले नाहीत, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना खरे बोलण्याची शिकवण देत असतो; परंतु शिक्षक स्वतःच खोटेपणाने वागत असेल, पदासाठी खोटे दाखले देत असेल, तर विद्यार्थ्यांना तो काय आदर्श घालून देणार असा प्रश्न या निमित्ताने पालक उपस्थित करीत आहेत.
पदवीधर शिक्षकाचा कांगावा – डहाणू तालुक्यातील एका केंद्रातील पदवीधर शिक्षकांच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. या शिक्षकाने त्याला एक सप्टेंबर 2002 नंतर अपत्य होऊनही ही माहिती पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या वेळी दडवून ठेवली. आता तर या पदवीधर शिक्षकाने एक सप्टेंबर 2002 नंतर आपल्याला एकही अपत्य झाले नाही, असा कांगावा सुरू केला आहे.
दाखला देणारे मुख्याध्यापक खोटे का?-
या शिक्षकाचे अपत्य ज्या शाळेत शिकते, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेला पदवीधर शिक्षकाच्या अपत्याचा जन्म तारखेचा दाखला खोटा समजायचा, का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पदवीधर शिक्षकाने पदासाठी आपले अपत्य लपवून ठेवावे, यासारखा दुसरा संतापजनक प्रकार असू शकत नाही, अशी भावना शिक्षकांची आहे. हा पदवीधर शिक्षक एकदा नव्हे, तर दोनदा तिसऱ्या अपत्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपासून दडवून ठेवून संचालक झाला.
पदाधिकाऱ्यांचे हात कशाखाली गुंतले?
शिक्षकांना सर्वसाधारणतः परस्परांची माहिती असते. पालघर शिक्षक पतपेढीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनाही या पदवीधर शिक्षकाच्या तिसऱ्या अपत्याची माहिती होती; परंतु पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना का पाठीशी घातले, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या पदवीधर शिक्षकाच्या तिसऱ्या अपत्याबाबत जिल्हा उपनिबंधक आणि संबंधित पतसंस्थेकडे वारंवार तक्रारी होत असूनही आताचे अध्यक्षही त्यांना का पाठीशी घालतात, असा प्रश्न निर्माण होतो.
कोटींची उलाढाल असलेल्या संस्थेचा संचालक – ठाणे/पालघर जिल्हा शिक्षक पतपेढीची उलाढाल कोट्यावधी रुपयांमधे आहे. शिक्षकच या पतसंस्थेचे सभासद, ठेवीदार आणि कर्जदार आहेत. अशा मोठ्या संस्थेच्या संचालकांच्या खोटेपणाबाबत केलेल्या तक्रारीला ठाणे येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून आतापर्यंत केराची टोपली दाखवली जात होती. आता याबाबत मोठ्या प्रमाणात आवाज उठवल्याने दबक्या आवाजात जिल्हा उपदबंधक कार्यालय चौकशी केल्याचे सांगत असले, तरी त्यातूनही अनेक प्रश्न उपस्थित होतात.
चौकशीचा फार्स – ज्या शिक्षकांनी संबंधित पदवीधर शिक्षकांच्या तिसऱ्या अपत्याविषयी तक्रारी केल्या, त्यांची बाजू ऐकून का घेतली नाही, म्हणणे मांडण्यासाठी त्यांना का बोलवले नाही आणि पदवीधर शिक्षकांच्या तिसऱ्या अपत्याविषयी या शिक्षकांकडे असलेल्या पुराव्याची खातरजमा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने का केली नाही, असे सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
कोकण विभागीय सहनिबंधक करणार चौकशी
दरम्यान, कोकण विभागीय निबंधक कार्यालयातील सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. पालघर प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या या संचालकांबाबतच्या तक्रारी, त्यांच्या तिसऱ्या अपत्याबाबतचे पुरावे मागवून घेऊन त्याआधारे चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत संबंधित पदवीधर शिक्षक दोषी आढळला, तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान सहकार कायद्यानुसार मला जे अधिकार मिळाले आहेत, त्यानुसार मी संबंधितांची चौकशी करणार आहे.
मिलिंद भालेराव, विभागीय सहनिबंधक, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग