डिव्हायडरला भरधाव कार धडकून पेटली; २ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, मृतात एका पोलीसाचा समावेश
बीड -जामखेड रस्त्यावर जामखेडच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी कार सोमवारी पहाटे चार वाजता कावेरी हॉटेल जवळील डिव्हाडरला धडकली असता कारला आग लागली.
जामखेड – (जिल्हा अहिल्यानगर): बीड -जामखेड रस्त्यावर जामखेडच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी कार सोमवारी पहाटे चार वाजता कावेरी हॉटेल जवळील डिव्हाडरला धडकली असता कारला आग लागली. या आगीत कारमधील दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये एका पोलीस कर्मचारी व व्यवसायकाचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामखेड येथील महादेव दत्ताराम काळे, (वय २८ रा. आदीत्य मंगल कार्यालय शेजारी, बीड रोड, जामखेड) व धनंजय नरेश गुडवाल, (वय ३५, पोलीस कॉन्स्टेबल, जामखेड पोलीस स्टेशन) सोमवारी पहाटे चार वाजता बीड जामखेड रस्त्याने जामखेड येथे येत असताना कावेरी हॉटेल जवळ, राऊत मैदान या ठिकाणी (कार क्रमांक MH 16 DM 5893) ही डिव्हायडरला धडकून कारला आग लागली. आगीने काही क्षणातच गाडीला वेढा घातला. त्यामुळे गाडीत अडकलेल्या दोघांना बाहेर पडण्यास संधीच मिळाली नाही.
घटनेनंतर काही वेळातच गाडी पूर्णतः जळून कोळसा झाली. अग्नीशामक दलाच्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न झाला. तोपर्यंत कारमधील महादेव दत्ताराम काळे व पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल यांचा मृत्यू झाला होता. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी पोलीस कर्मचारी सह घटनास्थळी भेट दिली.