ट्रकवाल्यांना लुटणाऱ्या आरटीओ व पोलिसांनी महाराष्ट्राला देशात बदनाम केले!
महाराष्ट्र आरटीओ व महाराष्ट्र पोलिस, देशभरात ट्रक चालकांना त्रास देण्यात प्रसिद्ध आहेत. त्यातही अहिल्यानगर व जळगावची खूप आघाडी आहे.परवा जळगाव पोलिस दलातील एका सफेद गणवेशधारी पोलिसाने तर महाराष्ट्र पोलिस दलाची पार इज्जतच घालविली. त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. कजगावच्या शेतमाल घेवून जाणाऱ्या एका शेतकर्याने, पाचशे रुपये मागून पन्नास रुपये घेणाऱ्या या कॉन्स्टेबलचा व्हिडिओ व्हायरल केला. सदर कॉन्स्टेबलने गाडी अडवून पाचशेची मागणी केली. तेव्हा शेतकरी म्हणाला, ” कजगावची गाडी आहे. दररोज ये-जा करतो. नेहमी इतकेच देतो. पोलिस म्हणतो – पाचशे ss पाचशे. ट्रकवाला म्हणतो – पन्नास ss पन्नास. पोलिस म्हणतो – पन्नासची इज्जत आहे काय आमची? चल शंभर दे! शेतकरी ट्रक चालकाला उद्देशून म्हणतो – सोमाभाउ पन्नास दे पन्नास ss पन्नास! आणि पोलिस पन्नासची नोट घेवून खिशात घालतो.”
संपूर्ण पोलिस दलाची इज्जत घालविणारा हा प्रकार आहे. या नंतर सदर पोलिसावर कारवाई वगैरे होईल. हा एक प्रकार व्हिडिओने समोर आला. पण हा प्रकार अपवादात्मक नाही. हे तर दररोज सर्वत्र सर्रास सुरु आहे. कोणते ही पो.स्टे. किती हेवी आहे, हे ठरविण्याच्या फूट पट्टीत हे एन्टीस्पॉटही सामील असतात. पूर्वीच्या काळी जुल्वानिया, काही घाट रस्ते व काही विशिष्ठ भागातून प्रवास करताना प्रवाशांना हमखास लुटले जात असे. पूर्वी सुपा टोलनाका, कल्याण रोड, संभाजीनगर रोडवर नेवासा फाट्याजवळ, रुई छत्तीसी, विळदघाट, करंजी घाट या सर्व भागात रस्ता – लूट होत आहेच.
तसेच आता आधुनिक काळात राज्याची सीमावर्ती नाकी व हायवे वर विशिष्ठ ठिकाणी नेहमीच असे सफेद गणवेशातील सफेदपोश ट्रक चालकांना लुटणारे लुटारू उभे असल्याचे दिसते. गाडीची कागदपत्रे, लोड वगैरे कितीही नियमानुसार असू द्या! यांना एन्ट्री दिल्या शिवाय ट्रकवाल्याची सुटका नसते. अशा कुठल्याही ट्रक ड्रायव्हरला विचारून बघा,’ सर्व नियमाने असले तरी ही एन्ट्री कां देतात?’ ते म्हणतात, ‘सर्व काही नियमाने असले तरी यांच्या मढ्यावर एन्ट्री फेकली नाही तर तासन् – तास ते ट्रक अडवून ठेवतात. वेळेचे नुकसान होते.’ मोठीच शरमेची बाब आहे.
रात्रीचा दिवस करून देशाच्या अर्थ व्यवस्थेत धमन्यांचे काम करून योगदान देणाऱ्या ट्रक ड्रायव्हरांना अशी वागणूक देणे, एकूणच शासकीय यंत्रणेसाठी शरमेची बाब आहे. अर्थात आरटीओ व एसटीबी पोलिस, शहरातील प्रवेश ठिकाण आदींची जागोजागी एन्ट्री फी ची ही रक्कम त्या मालाच्या एकूण ट्रान्सपोर्ट खर्चात धरली जाते. पर्यायाने वाहतूक होणाऱ्या त्या मालाची किंमत तेवढी वाढते. म्हणजे शेवटी एन्ट्रीचा हा भुर्दंड सर्व सामान्य नागरिकांवर पडत असतो.
त्यामुळे आता सर्व सामान्य नागरिकांनीच या एन्ट्री संस्कृती विरोधात एल्गार पुकारला पाहिजे. एवढे बरे आहे, की दिवसभरात नोटांच्या गोण्याच्या गोण्या ठेसून – ठेसून भरणारे महाराष्ट्राचे सीमावर्ती आरटीओ चेकपोस्ट येत्या पंधरा एप्रिल पासून बंद होणार आहेत. या आरटीओ चेकपोस्टच्या भरवशावर महिना काढणारे ‘ भिकारी डायरी ‘ तले बरेच गुंडश्री, तथाकथित नेते, कार्यकर्ते, समाज सेवक यांचे आता कसे होईल? घर संसार चालविण्यासाठी त्यांना कामधंदा शोधावा लागेल.
अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. म.प्र., गुजरात या राज्यातील व देशाच्या अन्य राज्यातून येणाऱ्या परप्रांतीय ट्रक व अन्य वाहनांना महाराष्ट्रात जागोजागी ठरवून टार्गेट केले जाते. जबर वसूली केली जाते. पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, जळगाव जिल्हे यासाठी अधिक बदनाम आहेत. थेट विधान सभेतही हा विषय गाजला आहे. या अतिरेकाचा परिणाम म्हणून देशात इतर राज्यात आता उलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
इतर राज्यात परप्रांतीय वाहनांबाबत इतका अतिरेक नाही. परंतु इतर राज्यात आता महाराष्ट्र इतके बदनाम झाले आहे, की बदला म्हणून महाराष्ट्र पासिंग च्या ट्रकांना – वाहनांना तेथील आरटीओ डोळे पुसून बघू लागले आहेत. विशेषतः तामीळनाडू मध्ये. एक काळ असा होता, की देशात महाराष्ट्राचे प्रशासन सर्वश्रेष्ठ मानले जात असे. महाराष्ट्राची प्रशासकीय यंत्रणा इतर राज्यांना पथदर्शी वाटत असे. कुठे गेली ती महती? आता उलट महाराष्ट्र आरटीओ व पोलिसांनी या एन्ट्री मोहिमेमुळे या प्रगतीशील राज्याला देशात बदनाम करून सोडले आहे. विशेष करून महाराष्ट्र आरटीओची ही लुटारू प्रतिमा बदलली पाहिजे. आता मुख्यमंत्र्यानीच यात लक्ष घातले पाहिजे!