नेवासे तालुक्यातल्या सोनईतली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा क्रमांक दोन ही एकेकाळी अत्यंत गजबजलेली आणि वैभवशाली अशी शाळा होती. रिंधे गुरुजी, लिपाने गुरुजी, गडाख गुरुजी, कोरडे गुरुजी आदी संस्कारक्षम प्राथमिक शिक्षकांच्या धाकात वाढलेल्या आणि आजमितीला वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांची आवडती शाळा आता दारुड्यांचा अड्डा बनली आहे. रात्रीच्या वेळी अनेक दारुडे या शाळेच्या परिसरात बिअरच्या बाटल्या फोडताहेत. विशेष म्हणजे या फोडलेल्या बियरच्या बाटल्या उचलून नेण्याची तसदीही दारुडे घेत नाहीत. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना या दारूच्या बाटल्या गोळा कराव्या लागताहेत. शिक्षण क्षेत्रातलं हे विदारक चित्र बदलविण्याची अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सुबुद्धी सुचेल का, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या या शाळेत एकेकाळी अनेक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे. या शाळेचे मैदान विद्यार्थ्यांच्या गोंगट आणि धावपळीमुळे सतत गजबजून जायचं. मात्र खासगी शिक्षण स्पर्धेच्या या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेची ही शाळा सध्या केवळ मरणकळा सहन करते आहे.
सोनईचं स्थानिक पोलीस प्रशासन रात्रीच्या गस्तीमध्ये या दारुड्यांचा बंदोबस्त करील का, अशी विचारणा पालक वर्गातून केली जात आहे. या शाळेत सध्या फक्त पहिली ते चौथीचे वर्ग भरत आहेत. या परिसरात एक उर्दू शाळादेखील आहे. त्या शाळेत 13 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शाळा सुरु होण्यापूर्वी सकाळी सकाळी बियरच्या बाटल्या,’चकणा’ आणि ‘युज अँड थ्रो’ची ताटं गोळा करण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे. परिणामी या शाळेतल्या महिला शिक्षकांची प्रचंड अशी कुचंबना होत आहे. या शाळेभोवती भक्कम अशी संरक्षण भिंत आणि गेट बांधल्यास हा घाणेरडा प्रकार बंद होईल, अशी अपेक्षा पालकांमधून व्यक्त केली जात आहे.