वर्ग २ च्या जमिनीचं गहाणखत किंवा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येत नाही, ही बाब ध्यानात घेऊन ती जमीन ज्यांच्या नावावर आहे, त्या किशोर त्रिंबक वाघमारे (रा. बायजाबाई जेऊर, ता. नगर, जि. अ. नगर) आणि त्यांची बहीण सरिता विलास काळोखे (रा. श्रीरामपूर) हे दोघे जीवंत असतानादेखील या दोघांच्या मृत्युचे खोटे दाखले तयार करुन तब्बल ६ एकर बागायती जमीन गिळंकृत करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात नेवासे पोलिसांसह नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चांदणे यांनी नुकतंच निवेदन दिलंय.
या निवेदनात चांदणे यांनी म्हटलंय, की किशोर वाघमारे यांना मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी सहा एकर शेती गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. पण ती वर्ग २ ची जमीन असल्यानं कोणीही गहाणखत करण्यास तयार नव्हतं. दरम्यान, वाघमारे यांच्या ओळखीचे युनुस देशमुख (रा. खडका फाटा, नेवासा, जि. अ. नगर) यांनी वाघमारे यांना पैसे देण्याची तयारी दर्शविली.
वाघमारे यांची जमीन गहाण न ठेवता युनुस देशमुख यांनी किशोर वाघमारे आणि त्यांची बहीण सरिता काळोखे यांचं मृत्युपत्र तयार करायला सांगितलं. पैशांची अत्यंत गरज असल्यानं वाघमारे त्यासाठी तयार झाले. २ फेब्रुवारी २०२३ रोजी सायरा बानू युनुस देशमुख या नावानं मृत्युपत्र तयार करण्यात आलं. मात्र या मृत्युपत्रात नक्की काय लिहिलं आहे याची माहिती न देता किशोर वाघमारे आणि सरिता काळोखे यांच्या सह्या घेऊन देशमुख यांनी त्यांना १ लाख रुपये दिले. दरम्यान, तीन ते चार वर्षांनंतर वाघमारे यांनी घेतलेली एक लाख रुपयांची रक्कम परत करून मृत्युपत्र आणि नोटरी रद्द करण्याचं ठरलं होतं. त्यानंतर युनूस देशमुख यांना वेळोवेळी एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात आली. वाघमारे यांनी देशमुख यांच्याकडे मृत्युपत्र आणि नोटरी रद्द करण्यासाठी वेळोवेळी तगादा लावला मात्र त्यांनी ते रद्द केलं नाही. दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी वाघमारे हे त्यांच्या जमिनीकडे गेले असता युनूस देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाने वाघमारे यांना मारहाण केल्याचं वाघमारे यांनी सांगितलं. ‘महासत्ता भारत’ वेब न्यूज नेटवर्कशी बोलताना वाघमारे यांनी संपूर्ण हकिकत सांगितली.