मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आजीवन लढा देणारे स्वर्गीय विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष सर्वांना लक्षात असेलच. त्यांचे बंधू रामहरी मेटे यांच्या जय शिवसंग्राम या पक्षाला महायुतीचा घटक पक्ष म्हणून नुकतीच मान्यता देण्यात आलीय. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेनं जय शिवसंग्राम या पक्षाला महायुतीचा घटक पक्ष म्हणून सामावून घेण्यात आलं आहे.
पक्ष स्थापनेनंतर अवघ्या चार महिन्यांत स्वर्गीय विनायक मेटे यांची स्वप्नपूर्ती झाल्यामुळे जय शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. स्वर्गीय विनायक मेटे यांच्या अकाली निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली होती, ती भरुन काढण्यात त्यांचे बंधू रामहरी मेटे, प्रदेशाध्यक्ष सुरेश शेटे पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना घवघवीत यश आलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत जय शिवसंग्राम पक्ष महायुतीसोबत एकनिष्ठेनं राहील, असं आश्वासनदेखील यावेळी देण्यात आलं. या निर्णयामुळे जय शिवसंग्राम पक्षाच्या राज्यभरातल्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.