नेवासे तालुक्यातल्या चांदा या गावात असलेल्या तीन कत्तलखान्यांतून दररोज हजारो किलो गोमांस आणि अनेक गोवंश (गावरान गायीची वासरं) छत्रपती संभाजीनगरसह गंगापूरकडे रवाना केली जाताहेत. ओरडू नये म्हणून वासरांच्या तोंडाला चिकटटेप लावून हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस काय करताहेत? आणि ‘जय श्रीराम’चा नारा लावणारं सरकार गोहत्या का थांबवत नाही, असे प्रश्न विचारले जाताहेत.
सायरन वाजवत पोलीस आले आणि हात हलवत गेले…!
चांदा हे गाव सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं. काही गोरक्षकांनी शनिवारी (दि. ८) या पोलिसांना फोन करुन खबर दिली, की एका टेम्पोत ३५ जनावरं आहेत. त्यामध्ये गोवंश (गायींची वासरं) मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानुसार घोडेगाव चौफुल्यावरुनच पोलीस गाडी सायरन वाजवत चांद्यात आली. मात्र गाडीच्या खाली उतरण्याची जराशीही तसदी न घेता पोलीस हात हलवत परत गेले. मात्र तिथून जवळच जनावरांची तस्करी सुरु होती, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
खबर देणाऱ्याचंच नाव होतं ‘लिक’…!
अवैध धंदे आणि कत्तलखान्याची पोलिसांना खबर देणाऱ्याचं नाव जाहीर न करण्याचा पोलीस खात्यात रिवाज आहे. पण हा धंदा करणारे इसम आणि काही स्थानिक पोलिसांचं इतकं अतूट नातं तयार झालं आहे, की खबर देणाऱ्याचंच नाव सर्वात आधी संबंधितांना दिलं जातं. त्यामुळे या पोलिसांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
साहेब, तुळशीच्या माळेऐवजी हाडांची माळ घाला…!
स्थानिक पोलीस या कत्तलखान्यावर कारवाई का करत नाही, या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीत आहे. कत्तलखाने चालविणारे आणि स्थानिक पोलिसांची या धंद्यात ‘स्लिपिंग पार्टनर’ आहे. त्यामुळेच एका वैतागलेल्या गोरक्षकानं ‘साहेब, तुळशीच्या माळेऐवजी हाडांची माळ घाला’, अशा आशयाचं स्टेटस त्याच्या मोबाईलवर ठेवलं होतं.
‘चिरीमिरी’ घेणाऱ्याला नरकात जागा मिळत नाही…!
हिंदू धर्मात गायीला गोमाता म्हटलं जात असलं तरी या गोमातेचं गोमांस विकून ‘रग्गड’ पैसा कमविणारे या जिल्ह्यात भरपूर लोक आहेत. मात्र ज्या पोलिसांच्या आशिर्वादानं हा गोरखधंदा सुरु आहे, ते सारेच नाही. मात्र काही पोलीस आणि चक्क पोलीस अधिकारी हा धंदा करणाऱ्यांकडून ‘चिरीमिरी’ घेत असल्याची चांद्यात जोरदार जोरदार चर्चा आहे. गाय कापणाऱ्या लोकांकडून ‘चिरीमिरी’ घेणाऱ्याला नरकात जागा मिळणार नाही, असं अनेक किर्तनकार सांगताहेत. किमान एवढं तरी भान संबंधितांनी ठेवावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.