अहमदनगर (प्रतिनिधी)- घराचे मोजमाप कोणाला विचारुन घेतो? असे म्हणत घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण करुन महिलेची साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याबद्दल सुदर्शन गोहेर (रा. वडारवाडी) याच्यावर विनयभंगासह मारहाण करुन जीवे मारण्यास धमकावल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात प्रविण बागडी, मिना गोहेर व पल्लवी गोहेर (सर्व रा. वडारवाडी) यांचा देखील समावेश आहे. हे प्रकरण 18 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता वडारवाडी येथे घडले असून, महिलेच्या फिर्यादीवरुन चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेचे दिर यांनी घराचे स्लॅब टाकायचे असल्याने जागेची मोजमाप केली होती. कुटुंबीय घरात चहा-पाणी करत असताना तेथे सुदर्शन गोहेर हा आला. त्याने बाहेरुन आवाज देऊन दिराला बोलावले. घराचे मोजमाप कोणाला विचारून घेतो? असे म्हणत त्याने घरात घुसून कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
सासरे यांनी त्याला समजावले असता, तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने अंगावर धावून येऊन साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. दिराला ढकलून घराच्या बाहेर काढले. जाव व पती दारात आले असता त्याने खुर्ची फेकून पतीला मारली. त्याचबरोबर मीना गोहेर, पल्लवी गोहेर यांनी मला व पती, जाव यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तर प्रविण बागडी याने पतीस शिवीगाळ व मारहाण करुन परत जागेची मोजणी केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत महिलेने म्हंटले आहे.