पुणे शहर आणि परिसरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केले आहे. विकास सुनील घोडके (रा. दयानगर सोसायटी, गणेशनगर, वडगाव शेरी, पुणे मूळचा रा. मिरी रोड विद्यानगर, शेवगाव, जि. अहमदनगर) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या आरोपीकडून पोलिसांनी 5 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुणे शहरात वाढत्या घरफोडीच्या अनुषंगानं गुन्हे दोनचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी गस्तीवर असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने आणि अमोल सरडे यांना आरोपीची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक करुन चौकशी केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत भारती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला.
विकास घोडके हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून अशा विरुद्ध कल्याण, पुणे, चिंचवड आणि लातूर या ठिकाणी 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. घोडकेला अटक करण्याची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) शैलेश बलकवडे, पोलीस उपयुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार अमोल सरडे, गजानन सोनुने, नागनाथ राख, निखिल जाधव, विनोद चव्हाण यांच्या पथकानं केली.