नगर – मनमाड महामार्गाच्या कडेला विळद घाट ते कोल्हार या अंतरामध्ये गॅसलाईनचं काम सुरु आहे. हे काम पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. मात्र हे काम करणाऱ्या ठेकदाराकडून प्रचंड असा बेजबाबदारपणा केला जात आहे. या महामार्गावर सतत वाहनांची ये – जा सुरु असते. या कामात म्हणावी तशी काळजी घेतली गेलेली नाही. त्यामुळे आयुष्यात एखादी दुर्घटना घडून जिवितहानी होऊ शकते. याचा गांभीर्याने विचार करुन संबंधित ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशा मागणीचं निवेदन सामाजिक कार्यकर्ते अमोल कोठारे यांनी जिल्हा प्रशासनाला दिलं आहे.
या निवेदनात कोठारी यांनी म्हटलं आहे, की ही गॅसलाईन ठिकठिकाणी सिमेंट काँक्रेटने व्यवस्थितरित्या बुजवली जाणं आवश्यक आहे. मात्र तसं झालेलं नाही. ठिकठिकाणी ही गॅसलाईन उघडी आहे. या महामार्गावर अवजड वाहनासह इतर प्रकारच्या वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. सर्वच वाहनांसाठी हे खूप धोकादायक आहे.
सर्व परिस्थितीचा विचार करुन संबंधित ठेकेदाराला या कामाचं बिल अदा करण्यात येऊ नये. त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी. अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल.
सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांनी या निवेदनाच्या प्रती भारत सरकारचे पेट्रोलियम मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिल्या आहेत.