गणेश शिंदे यांना मोठी संधी
कृषी परिषदेवरती लागली वर्णी…
व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्याख्याते म्हणून आपलं नावलौकिक कमावलच आहे. परंतु शासनाच्या अनेक उपक्रमात सहभागी होऊन आपल्या ज्ञानाचा व वक्तृत्वाचा ठसा कायम उमटवला आहे. त्यांच्या कर्तृत्वाला शासनाने ही नेहमी संधी देत त्यांचा सन्मान ठेवला आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य असणारे गणेश शिंदे यांना आता राज्याच्या कृषी परिषदेवरती संचालक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली आहे. ही नगर तालुक्यासाठी भूषणावह गोष्ट आहे.
गणेश शिंदे हे नगर तालुक्यातील पारगाव भातोडी गावचे मूळ रहिवासी असून. त्यांच्या नेतृत्वाखाली पारगाव भातोडी आदर्श गावाकडे वाटचाल करत आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य म्हणून कार्य करत असताना. विद्यापीठाचे तंत्रज्ञान नवीन पणन प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. शेतकऱ्यांचे मनोबल उंच व्हावे त्यांच्या घामाला व कष्टाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी गणेश शिंदे यांनी आजवर अनेक व्याख्याने दिली आहेत.
राज्याच्या कृषी परिषदेवरती कार्य करत असताना सर्व कृषी विद्यापीठांच्या ध्येय धोरणावर कार्य करण्याची संधी गणेश शिंदे यांना मिळाली आहे. भारत हा कृषिप्रधान देश असून येणाऱ्या काळात तो कृषी समृद्ध व्हावा यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. या प्रक्रियेमध्ये शासनासोबतच संशोधनाच्या दृष्टीने विद्यापीठांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शासन व विद्यापीठ यांमधील दुवा म्हणून कार्य करण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झाली. या संधीचे निश्चितच सोने करेल असा विश्वास गणेश शिंदे यांनी व्यक्त केला.
नगरमध्ये अण्णा हजारे पोपटराव पवार आदी मान्यवरांनी ग्रामविकास यंत्रणेमध्ये देशभरात नाव कमवले आहे. हाच आदर्श घेऊन व्याख्याते गणेश शिंदे यांनी शासकीय अभियानांमध्ये आपली वेगळी चुणूक दाखवली आहे. या निवडीबद्दल राज्यभरातून गणेश शिंदे यांचे कौतुक होत आहे.