शेवगांव : येथील खूनाच्या गुन्ह्यातील सराईत कुख्यात पिन्या कापसे याचे दोन साथीदार अहमदनगर एलसीबी टिम’ने पकडले. नितीन उर्फ बंटी रमेश पन्हाळे (वय ३७, रा. भगतसिंग चौक, शेवगांव, जि. अहमदनगर), आबासाहेब नवनाथ कातकडे (वय ३६, रा. ठाकुर निमगांव, ता. शेवगांव) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अहमदनगर अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या एलसीबीचे पोकाॅ मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, जालींदर माने, चापोकॉ अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.३ मार्च २०२४ रोजी फिर्यादी राजेश गणेश राठोड (वय २८, रा. बजरंगनगर, पो. बान्सी, ता. पुसद, जि. यवतमाळ) तसेच त्याचे इतर ४ साथीदार यांनी मागील भांडणाचे कारणावरुन पिन्या उर्फ सुरेश भारत कापसे (रा. आंतरवली, ता. शेवगांव) याच्या पिस्टलमधून फायर केला. परंतु त्यास गोळी लागली नाही. त्यावेळी पिन्या कापसे याने त्याचे ७ ते ८ साथीदारांसह फिर्यादी व साक्षीदार यांचा स्कॉर्पीओ गाडीने पाठलाग करुन त्यांना लाकडी लांडके, लोखंडी रॉड, दगडाने मारहाण केली होती. गुन्ह्यामध्ये जखमी अर्जुन पवार हा औषधोपचारादरम्यान मयत झालेला आहे. घटनेबाबत शेवगांव पोलीस ठाणे गु.र.नं. १९१/२०२४ भादवि कलम ३०२,३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्याबाबत एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना आदेश दिले होते. आदेशानुसार पोनि श्री आहेर यांनी एलसीबी टिम’ला आरोपींची माहिती काढुन आरोपींना ताब्यात घेणेबाबत पथकास सुचना देऊन रवाना केले होते.
एलसीबी टिम’ने दि.९ मार्च २०२४ रोजी शेवगांव या ठिकाणी जाऊन आरोपीची माहिती काढत असतांना पोनि श्री आहेर यांना गुन्ह्यातील आरोपी नितीन पन्हाळे व आबासाहेब कातकडे (दोन्ही रा. शेवगांव) हे शेवगांव या ठिकाणी आले असल्याची माहिती मिळाली. ती माहिती एलसीबी टिम’ला दिल्याने त्यांनी शेवगांव या ठिकाणी आरोपीची माहिती घेत असतांना दोघे शिवाजी चौक (शेवगांव) येथे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले, त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे नितीन उर्फ बंटी रमेश पन्हाळे, आबासाहेब नवनाथ कातकडे असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यास पुढील तपासकामी शेवगांव पोलीस ठाणे गु.र.नं. १९१/२०२४ भादवि कलम ३०२,३०७ प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी शेवगांव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले. पुढील तपास शेवगांव पोलीस करीत आहेत.