अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्वच्छता विभागात जे सफाई कर्मचारी नेमकणुकीला आहेत, त्यांच्यातल्या अनेक कर्मचाऱ्यांना गटारी आणि नाल्यांची साफसफाई अगदी पारंपारिक पद्धतीनं व वर्षानुवर्ष त्याच त्याच कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे. याउलट कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्वच्छता विभागात असे अनेक कर्मचारी आहेत, की वरिष्ठांची ‘मर्जी’ संपादन केल्यानंतर या कर्मचाऱ्यांना वाट्टेल त्या ठिकाणी ड्युटी दिली जाते. या सर्व गंभीर परिस्थितीवर नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांना आम्ही आवाहन करु इच्छितो, की खासदार निलेश लंके साहेब, अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाची एकदा झाडाझडती घ्याच. आणि हो, अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचेसी ईओ विक्रांत मोरे साहेब, या सफाई कर्मचाऱ्यांच्या व्यथा एकदा जरा ऐका.
अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डात वर्षांनुवर्षे अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत. त्यामुळे या अधिकाऱ्यांची संबंधित विभागांत एक प्रकारची मक्तेदारी झाली आहे. या अधिकाऱ्यांची मुजोरी आणि मनमानी इतकी वाढली आहे, की ब्रिटिश अधिकाऱ्यांप्रमाणे हे अधिकारी कर्मचाऱ्यांवर रुबाब दाखवत सत्ता गाजवत आहेत.
अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्वच्छता विभागात काही कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे शौचालये, नाल्या आणि गटारी साफ करण्याचंच काम करावं लागत आहे. तेच तेच कर्मचारी या कामावर राब राब राबत आहेत.
याच्या उलट परिस्थिती अशी आहे, की वरिष्ठांची ‘मर्जी’ सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘साहेबा’च्या बंगल्यावर, कॅन्टोन्मेंट ऑफिस मध्ये, बागेत, दवाखान्यात व शाळेत अशी चांगली ‘ड्युटी’ दिली जाते. विशेष म्हणजे ही ड्युटी देण्याचेसुद्धा पैसे घेत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
‘बळी तो कान पिळी’ अशी अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्वच्छता विभागात परिस्थिती पाहायला मिळत आहे. नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे आता लवकरच वेगवेगळ्या विभागांना भेटी देणार आहेत. अहमदनगर बोर्डाच्या परिसरातसुद्धा ते भेट देतील. या भेटीत अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
‘त्या’ कर्मचाऱ्यांचे पैसे खाणं म्हणजे गटारीतला गाळ खाणं…! – गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्वच्छता विभागात ठराविक कर्मचारी नाल्या आणि गटारींची साफसफाई करताना दिसत आहेत. या कर्मचाऱ्यांना हातमोजे आणि गम बूटसुद्धा नसतात. अशा निराधार आणि परिस्थितीमुळे असहाय्य असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करत चांगली ड्युटी लावण्याचे वरिष्ठांकडून पैसे घेणं म्हणजे स्वतःसह स्वतःच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांना नाल्या आणि गटारीतला गाळ खायला देण्यासारखं आहे, अशी भावना संतप्त कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.