पालघरः (योगेश चांदेकर) पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना अनेक संघटनांसह आता महायुतीतील भाजपनेही विरोध सुरू केला आहे. खा. गावित यांच्या विरोधात असलेल्या नाराजीची दखल घेऊन हा मतदारसंघ भाजपला सोडला नाही, तर पालघर लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या हातून जाईल, असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघात विविध संघटनांनी खा. गावित यांना विरोध केल्यानंतर आता भाजपनेही त्यात उडी घेतली आहे. हा मतदारसंघ हातचा गेला तर खासदार गावित यांचे फार नुकसान होणार नाही; परंतु भाजपचे मात्र मोठे नुकसान होणार आहे. विधानसभा आणि नंतरची जिल्हा परिषद निवडणूक जिंकायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला न देता भाजपकडे घेतला पाहिजे, असा आग्रह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे धरला असून याबाबत त्यांनी माध्यमांतून भूमिका मांडली आहे.
शिंदे गटाची अवघी दहा ते 12 टक्के मते
खा. गावित यांच्या विषयीच्या नाराजीला वाट मोकळी करून देताना पालघर लोकसभा मतदारसंघ कसा भाजपाचा आहे आणि येथून चिंतामण वनगा यांच्यापासून अन्य नेते कसे निवडून गेले याचा तपशील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या मतदार संघात झालेल्या सर्वेक्षणाचा आधार घेताना गावित यांच्याविषयी किती नाराजी आहे, याचा पाढा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वाचला. या मतदार संघात भाजपची 35 ते 40 टक्के मते आहेत तर शिवसेनेच्या शिंदे गटाची मते अवघी दहा ते बारा टक्के आहेत. त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघ महायुतीला जिंकायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचा उमेदवार नको, अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली असून हा मतदार संघ भाजपला सोडण्याचा आग्रह धरला आहे. लोकसभा मतदारसंघ जिंकला, तर त्याचा विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीवरही परिणाम होईल, असा दावा भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी केला असून याचे साकडे त्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना घातले आहे.
महायुतीत वादाची महाठिणगी
भाजपच्या या भूमिकेमुळे महायुतीतच वादाची महाठिणगी पडली आहे. भाजपच्या या पवित्र्यानंतर शिवसेनेचा शिंदे गटही भाजपवर नाराज झाला असून पक्षश्रेष्ठींकडे कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ भाजपला देऊ नये अशी भूमिका आता शिंदे गटाचे काही नेते घेत आहेत. त्यामुळे महायुतीतील शिवसेना व भाजपमध्ये आता वाद-प्रतिवाद सुरू झाला आहे.
भाजपकडून तिघे इच्छुक
भारतीय जनता पक्षाकडे हा मतदारसंघ आला तर या मतदारसंघातून दिवंगत माजी मंत्री विष्णू सवरा यांचे चिरंजीव डॉ.हेमंत सवरा, संतोष जनाथे, बहुजन विकास आघाडीतून भाजपत आलेले विलास तरे या तिघांची नावे चर्चेत आहेत. त्यातही सवरा यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून भाजपशी संबंध आहेत. भारतीय जनता पक्षाला तत्कालीन ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात वाढवण्यात हेमंत सवरा यांचे वडील दिवंगत माजी आदिवासी विकासमंत्री तसेच पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा व माजी खासदार चिंतामण वनगा यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते.
गावित नको असतील, तर आम्ही तयार!
दरम्यान खा. गावित यांच्या विषयी नाराजी असेल तर त्यांची उमेदवारी बदलून शिंदे गटातील पर्यायी उमेदवारांपैकी एकाचा विचार करावा, अशी मागणी आता शिंदे गटातून पुढे आली आहे, त्यानुसार शिंदे गटातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा वैदही वाढाण तसेच दिवंगत चिंतामण वनगा यांचे चिरंजीव पालघरचे विधानसभेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांची नावे आता पुढे आली आहेत त्यामुळे महायुतीत सर्व आलबेल झाले आहे.
बहुजन विकास आघाडीकडून तिघे चर्चेत
गेल्या दोन दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते अजीव पाटील यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर या मतदारसंघातून बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार राजेश पाटील, माजी मंत्री मनीषा निमकर तसेच माजी खासदार बळीराम जाधव यांची नावे चर्चेत आली आहेत. बहुजन विकास आघाडीत लोकसभा निवडणूक लढवण्यास कोण चर्चेत आहेत, यापेक्षा बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर काय निर्णय घेतात, यावर उमेदवारी निश्चित होत असते.