कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी…
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानअंतर्गत उपक्रम
अहिल्यानगर – अहिल्यानगर महानगरपालिका राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानात अहिल्यानगर जिल्हा कारागृहातील १७५ कैद्यांची आरोग्य तपासणी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली. मंगळवारी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. क्षय रोगमुक्त अहिल्यानगर करण्यासाठी शासनाच्या अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
मंगळवारी सकाळी शहरातील सबजेल कारागृह येथे आयुक्त यशवंत डांगे व कारागृह अधीक्षक संतोष कवार यांच्या हस्ते या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतिष राजुरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. साहिल शेख, कारागृहाच्या वैद्यकीय अधिकारी श्रीमती सुजाता सानप आदी यावेळी उपस्थित होते.
शिबिरात कैद्यांचे स्क्रिनिंग, छातीचा एक्स-रे तपासणी (हॅड हेल्ड इरे स्मार्ट एक्स-रे मशिनद्वारे), स्पुटम तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. डॉ. साहिल शेख, डॉ. सुजाता सानप, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली आरु, डॉ. विनय शेळके यांनी तपासणी केली. १७५ कैद्यांची शिबिरात तपासणी करण्यात आली. डॉ. साहिल शेख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रम विषयक माहिती डॉ. अविनाश आहेर यांनी दिली. अधीक्षक संतोष कवार, आयुक्त यशवंत डांगे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सुजाता सानप यांनी आभार मानले.