कराडः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती देशमुख यांनी स्वतः लिहीलेल्या कादंबऱ्यांचा हार करून, तो त्यांच्या पुतळ्याला घालून साजरी करण्यात आली. कराड येथे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात आले होते. ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १३ तारखेच्या मध्यरात्रीपासून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दिवसभर वेगवेगळ्या उपक्रमांनी ही जयंती साजरी करण्यात आली.
स्वतः लिहिलेल्या कादंबऱ्यांचा हार
डॉ. बाबासाहेबांची जयंती दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी करण्याचा देशभर प्रघात आहे. या निमित्ताने मिरवणुका, व्याख्याने तसेच अन्य उपक्रम आयोजित केले जातात. कराडमध्ये मात्र लेखक, पत्रकार अभयकुमार देशमुख यांनी पारंपारिक जयंती उत्सवाला फाटा देऊन स्वतः लिहिलेल्या कादंबऱ्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार करून घातल्या.
शिका, संघटित व्हा, संघर्ष करण्याचा कृतिशील संदेश
बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र दिला आहे. त्याचबरोबर अगोदर उपजीविकेचे साधन तयार करा आणि नंतर कार्यकर्ते व्हा असा सल्ला देण्यामागे आपला कार्यकर्ता लाचार असू नये, अशी त्यांची भावना होती. हीच भावना अभयकुमार देशमुख यांनी बोलून दाखवली आणि प्रत्यक्षातही आणली. त्यांनी स्वतः लिहिलेल्या मुखिया, एल्गार, वुई हेट, बायोलॉजिकल वार, मसनवाट, व्यक्त अव्यक्त भाग एक या कादंबऱ्यांचा हार तयार करून बाबासाहेबांच्या पुतळ्याला तो घातला आणि अभिवादन केले.
हे होते उपस्थित
या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष राहुल भोसले, माजी नगरसेवक आनंदराव लादे, विठ्ठलराव देशमुख, विक्रमसिंह देशमुख आदी उपस्थित होते. अभयकुमार यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. यापुढेही बाबासाहेबांच्या प्रेरणेतून आपण जे काही लिहू, त्या पुस्तकांचा हार करून बाबासाहेबांना घालून बाबासाहेब जयंती साजरी करत राहू, असे देशमुख यांनी या वेळी सांगितले.