पालघरः लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला कोकणातील एकही जागा न सोडल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघ तरी किमान काँग्रेसला सोडावा, अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. हा मतदारसंघ न सोडल्यास पालघरच्या कोकणातील सर्व मतदारसंघात महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवार देऊन मैत्रीपूर्ण करण्याचा इशारा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. गेल्यावेळी काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळाली असतानाही आता महाविकास आघाडीत काँग्रेस संपवण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून, पालघर अन्य मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या विरोधात लढणार आहेत. त्यामुळे काँग्रेसची ही रणनीती महायुतीला पोषक असून यावर आता काय तोडगा काढला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
..तर पक्षश्रेष्ठींचेही ऐकणार नाही
दरम्यान, काँग्रेसच्या वरिष्ठांकडे कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या असून आज व उद्या होणाऱ्या बैठकीत काय तोडगा निघतो, यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पुढील भूमिका अवलंबून असणार आहे; परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे राहणार असेल, तर मात्र वरिष्ठ ने कोणताही निर्णय घेतला तर अजिबात न ऐकता बंडाचा पवित्रा कायम ठेवण्याचा इशारा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
सांबरे, चोरगे, टावरे, गावित, नम इच्छुक
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून जिजाऊ संघटनेचे संस्थापक नीलेश सांबरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे तसेच गेल्या पाच वर्षांपूर्वी कपिल पाटील यांच्या विरोधात लढत दिलेले सुरेश टावरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. त्यांनी तसे अर्ज काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडे दिले आहेत. त्याचबरोबर पालघर लोकसभा मतदारसंघातून योगेश नम आणि बळवंत गावित यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आली आहेत.
राजकीय समीकरणे बिघडणार
भिवंडी लोकसभा मतदारसंघामुळे आता शेजारच्या पालघर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बिघडणार आहेत. काँग्रेसच्या या पवित्र्यामुळे भिवंडी आणि पालघर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती झाल्या, तर ते महायुतीच्या पथ्थ्यावर पडणार आहे. आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.