राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत सभागृहात बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि परभणी प्रकरणावर भूमिका मांडली. जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याला अटक करण्याची मागणी केली. ते म्हणाले की आज चर्चा लागलेली असताना चार जण अटकेत आहेत, एवढे दिवस सापडले नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांचा सहभाग 100 टक्के सहभाग आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
जितेंद्र आव्हाड काय म्हणतात पहा व्हिडिओ
संतोष देशमुख सोबत कायम चार पाच जण असायचे पण त्याला प्लॅन करुन बाहेर काढण्यात आलं. तो एकटा बाहेर कसा येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले. एक गाडी काळी म्हणतात ना ती स्कॉर्पिओ टोलनाक्यावर थांबवण्यात आली. बरोबर नियोजन करुन एक गाडी मागून आली.संतोष देशमुखला उतरवलं तेव्हा सुदर्शन घुलेच्या हातात दांडकं होतं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, माझ्याकडे यादी आहे अध्यक्षमहोदय, 3 जुलै 2024 ला दोन गटात गोळीबार झाला. पट भी मेरा चित भी मेरी, सगळी सूत्र वाल्मिक कराडवर आहेत. मला आश्चर्य वाटलं कुणी त्याचं नाव घेतलं नाही. दाऊद इब्राहिम आहे, छोटा शकील आहे. विधानसभेत सत्य समोर आणलं पाहिजे आपण, तिनशे हायवा कोण चालवतं? कुणाच्या जिवावर चालतात? अवादा कंपनीकडे हप्ता कुणी मागितला कळू द्या ना लोकांना, 3 जुलैच्या गोळीबारात मरळवाडीचा सरपंच बापू आंधळे मयत झाला. दुसऱ्या गटाचे माधव गिते जखमी झाला. बबन गिते तिथं नसताना त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल झाला, तो फरार झाला. वाल्मिक कराडचं नाव असताना त्याच्या कॉलरला हात दाखवण्याची हिंम्मत पोलिसांनी दाखवली नाही. वाल्मिक कराड त्यामध्ये 307 चा आरोपी आहे, आजपर्यंत कुठलिही कारवाई झाली नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
अध्यक्षमहोदय पंडू मुंडे नावाचा गुत्तेदार त्याचा खून झाला तहसीलदार कार्यालयासमोर माणसाची क्रूरता इथं दिसते. कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, याचा शोधच नाही, अता नाही पता नाही, हे गँग ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर आहे. वाल्मिक कराडचे व्हिडीओ कुणासोबत आहेत हे माहिती नाही का तुम्ही एसआयटीची मागणी करता, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
परळीत सो जा बच्चे वरना वाल्मिक आ जायेगा असं झालं आहे. वाल्मिकची इतकी हिंम्मत होणार नाही. बदल्या त्याच्या सांगण्यावरुन, नियुक्त्या त्याच्या सांगण्यावरुन, पीएसआय त्याच्या सांगण्यावरुन एवढंच नाही जेलची एक अधिकारी तिची फाईल गायब झाली होती दोन महिने आता सापडली आहे. कोणीच काही बोलायला तयार नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात इतकी क्रूर अन् राजकीय हत्या कुठं झालीय असं वाटत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आका कोण आहे आपल्याला माहिती आहे, हे कोण करतं हे मला माहिती आहे. तो जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशीची अपेक्षा करता, काय चौकशी होणार आहे? साहेब महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम असेल आणि संतोष देशमुखच्या दोन्ही पोरांची शपथ असेल तर त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा, निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी करा. मर्डर झाल्यानंतर तुमच्या मंत्रिमंडळात बदल दिसेल, पण काही बदल दिसला नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.