अहिल्यादेवीनगर (अहमदनगर) महापालिकेच्या अजब गजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. बुरुडगाव कचरा डेपोत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारात बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत महापालिका प्रशासनानं स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख, परिक्षित एस. बीडकर, प्रशांत विजय रामदिन, अविनाश वसंतराव हंस, बाळू जगन्नाथ विधाते, राजेश प्रकाश तावरे यांना नोटीस बजावल्या आहेत. मात्र यामध्ये एका कंत्राटी कामगारालाही नोटीस देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या कंत्राटी कामगारानं त्या नोटिशीला उत्तर म्हणून त्याचा खुलासादेखील महापालिका कार्यालयाकडे पाठवला आहे. ते खुलासा पत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत पाहिलं नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटी कामगारानं काय खुलासा केला, हे कळू शकलेलं नाही.
दरम्यान, महानगरपालिकेकडे अनेक सॅनेटरी इन्स्पेक्टर अर्थात स्वच्छता निरीक्षक आहेत. हे अधिकारी महापालिकेत कायमस्वरुपी नोकरीला असून त्यांना सरकारी पगार मिळतो. मात्र कंत्राटी कामगार हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत असतो. अश्या कंत्राटी कर्मचाऱ्याला कचरा डेपोवर जबाबदार पदावर नियुक्ती कोणाच्या आदेशाने दिली. कचरा डेपोवर तो कर्मचारी नेमके काय काय करत होता याची माहिती सुद्धा घेणे आवश्यक आहे.
अशा परिस्थितीत त्याला महापालिका प्रशासनानं नोटीस कशाच्या आधारे पाठवली असावी, हा नगरकरांना पडलेला मोठा गहन प्रश्न आहे.