नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्याचा तपास करण्यासाठी ज्यावेळी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांची नियुक्ती करण्यात आली, त्यावेळी या बँकेच्या घोटाळेबाज संचालकांना पळता भुई थोडी झाली होती. म्हणूनच डीवायएसपी मिटकेंची बदली झाल्यानंतर या घोटाळेबाजांनी फटाके फोडून आसुरी आनंद व्यक्त केला होता. असं असताना नगर अर्बन बँकेचा फरार असलेला माजी अध्यक्ष राजेंद्र अग्रवालच्या मुसक्या कधी आवळणार, असा प्रश्न नगरचे एस. पी. राकेश ओला यांना विचारला जात असतानाच तपास यंत्रणेवर कोणाचा दबाव आहे, अशी शंकादेखील ठेवीदारांच्यामधून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, डीवायएसपी संदीप मिटके यांच्या बदलीनंतर नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्याचा तपास कमालीचा थंडावला असल्याचं ठेवीदारांमधून बोललं जात आहे. जवळपास 300 कोटी रुपयांच्या ठेवी मिळतील, अशी अपेक्षा ठेवीदारांना होती. मात्र या आर्थिक घोटाळ्याचा तपास करणारे पोलीस अधिकारी कोर्टात तारखेला येत नाहीत, असा आरोप करत ठेवीदारांनी या आर्थिक घोटाळ्याचा तपास एलसीबी, सीबीआय, सीआयडी किंवा ईडी यापैकी कोणत्या तरी एका सक्षम यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी आज (दि.१ एप्रिल) कोर्टात केली. या संदर्भात नाशिक विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांना (आयजी) नोटीस काढण्यात यावी, अशी मागणीदेखील ठेवीदारांनी कोर्टाकडे केली. यावर कोर्टाने सरकारी वकीलांना त्यांचं म्हणणं सादर करण्याचा आदेश दिला. त्यावर सरकारी वकिलांनी या आर्थिक घोटाळ्याचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांशी चर्चा करुन अहवाल सादर करण्याचं कोर्टाला सांगितलं.
आरोपींना पकण्याचे काम एलसीबीकडे द्या…! – नगर अर्बन बॅंकेच्या आर्थिक घोटाळ्याचा तपास थंडावल्यानं ठेवीदार हवालदिल झाले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जर मिळाल्या नाहीत तर वृद्धापकाळात आम्ही जगायचं तरी कसं, अशी चिंता ठेवीदारांनी व्यक्त केली आहे. कोणत्याही अट्टल गुन्हेगाराला पकडण्यासाठी नगरच्या एलसीबीचा मोठा हातखंडा आहे. त्यामुळे या आर्थिक घोटाळ्यातल्या आरोपींना शोधून आणत त्या सर्वांच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी नगर एलसीबीकडे देण्यात यावी, अशीदेखील मागणी या निमित्तानं केली जात आहे.