नगर शहरातल्या ताबेमारीच्या प्रकरणाचं लोन एमआयडीसीपर्यंत आलं की काय, अशी भिती स्थानिक रहिवाशांमधून व्यक्त केली जात आहे. बोल्हेगाव, नागापूर नवनागपूर, वडगाव गुप्ता या परिसरांमध्ये जमिनीचे बरेचसे संशयास्पद व्यवहार सुरु आहेत. या पोलीस ठाण्यातून अन्यत्र बदलून गेलेल्या पण अजूनही स्थानिक ‘सोर्स’ जपत असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन ही सर्व ‘गडबड’ सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या ‘गडबडी’कडे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना लक्ष द्यावंच लागणार आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही जी काही ‘गडबड’ सुरू आहे, त्यावर एसपी ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्यामार्फत (LCB) खरं तर करडी नजर ठेवण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. या भागातले जमिनीचे काही व्यवहार न्यायप्रविष्ठ आहेत. तर काही न्यायप्रविष्ठ
होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र तत्पूर्वीच संबंधितांना पोलीस यंत्रणेकडून दिलासा मिळण्याची आवश्यकता आहे.
नगरच्या ताबेमारीचं प्रकरण ताजं असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या बोल्हेगाव, नागपूर, नवनागापूर, वडगाव गुप्ता या भागात सुरू असलेल्या जमीन विक्रीच्या संशयास्पद व्यवहारासंदर्भात काही तक्रारी स्थानिक पोलिसांकडे आल्या आहेत. विशेष म्हणजे या ‘गडबडी’वरून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एसपी ओला यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.