एमआयडीसीच्या भूखंडांवर बेकादेशीर धंदे? अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचा संशय…! उद्योजकांना मात्र प्लॉट शिल्लक नाही..
महासत्ता भारत / अहिल्यानगर
अहिल्यानगर एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी आणि उपअभियंता पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने अहिल्यानगर मधील नागापूर एमआयडीसीच्या शासकीय भूखंडावर बेकादेशीर उद्योग सुरू आहेत. या धंद्यांमध्ये एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचीच मिलीभगत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचं या धोकेदायक धंद्यांकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
एकीकडे उद्योजकांना एमआयडीसी प्लॉट शिल्लक नाही, असं संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातं. मात्र एमआयडीसीच्या शासकीय भूखंडांवर एमआयडीसी कार्यालयाचे अजिबात लक्ष नसल्याने अतिक्रमण करत प्लॉट बळकावण्याचा व्यवसाय सुरू करायचे, असा सपाटा अनेकांनी लावला आहे. त्यामुळे फक्त ‘प्लॉट अलॉटमेंट’ करायचे व अतिक्रमणाला मूकसंमती द्यायची इतकीच आपली जबाबदारी असल्याच्या अविर्भावात अहिल्यानगर एमआयडीसीचे अधिकारी वावरत आहेत. अतिक्रमण धाराकांपासून उद्योजकांना अजिबात संरक्षण द्यायचे नाही असे अधिकाऱ्यांचे काम सुरू आहे.
अहिल्यानगर एमआयडीसीच्या शासकीय भूखंडांवर कसले कसले बेकादेशीर धंदे सुरू आहेत, या धंद्यांवर कोणाची मालकी आहे, यातून किती रुपयांचे भाडे गोळा केले जाते, एमआयडीसी परिसरातल्या विविध भागात चाललेले गैरप्रकार हे सारं अहिल्यानगर एमआयडीसीचे अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.
खरं तर या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आता आली आहे. सारं काही पोलिसांवर सोडून देत एमआयडीसी चे अधिकारी प्लॉटचं अलॉटमेंट झाल्यानंतर त्या प्लॉटवर नक्की काय सुरू आहे, तिथं किती ठिकाणी अतिक्रमणं झाली आहेत, त्या प्लॉटवर कोणकोणते बेकादेशीर व धोकेदायक धंदे सुरू आहेत, याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करणाऱ्या अहिल्यानगर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी नक्की कोण करणार, हाच खरा मोठा प्रश्न आहे.