ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत करून ब वर्ग समरी मंजुरीकरीता सहायक पोलीस निरीक्षक अशोक आव्हाळे यांनी 4 लाख 50 हजाराची रक्कमेची मागणी केली. तडजोडीत रक्कम 1 लाखावर आली. ती स्वीकारताना दप्तरी अंमलदार अनिल पाटील लाचलुचपत खात्याच्या पथकाने अटक केली. सपोनि आव्हाळे आणि पोलीस शिपाई अनिल पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार हे नायगांव परीसरात जमीन विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांच्या विरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात एक महिन्यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा इतर तीन इसमांनी संगनमत करुन खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा तक्रारदार यांच्या पत्नीने आरोप केला आहे.
या दाखल गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना मदत करून त्या गुन्ह्यांची ’ब वर्ग’ समरी मंजुरी करीता लोकसेवक सहाय्यक पोलिस निरीक्षक अमीत आव्हाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे साडेचार लाखाची मागणी केली होती. लोकसेवक यांनी त्यांच्या दप्तरी अंमलदार पोलीस शिपाई पाटील यांच्याकडे ही रक्कम देण्यास सांगितले.
लोकसेवक सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या सांगण्यावरुन पोलिस शिपाई पाटील यांनी साडे चार लाखापैकी तडजोडीअंती 1 लाख रूपये घेताना लाचलुपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. म्हणून यांच्याविरुद्ध नयानगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमा अंतर्गत बुधवारी (दि.6) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.