एका कर्जदाराच्या कर्जाचा खड्डा बुजविण्यासाठी नगर अर्बन बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी ‘सस्पेन्स अकाउंट’मधून दुसऱ्या कर्जदाराच्या खात्यात तीन कोटी रुपये जमा केले आणि त्या कर्जदाराचं कर्ज निल केल्याचं भासवलं. मात्र प्रत्यक्षात दुसऱ्या एका कर्जदाराला आठ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केलं असताना तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी चक्क 13 कोटी रुपये त्याला दिले.
अशा अफलातून करामती नगर अर्बन बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. अर्थात पोलीस तपासात हे सर्व उघड होणारच आहे. मात्र अनेक ठेवीदारांमध्ये अशा करामतींची जोरदार चर्चा आहे. शहर विभागाचे डीवायएसपी अमोल भारती याकडे लक्ष देणार का, असादेखील प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत.
दरम्यान, नगर शहरातल्या रासनेनगर भागात राहणाऱ्या अमोल प्रभाकर वैकर याला शहर विभागाच्या पोलीस पथकानं काल (दि. ३) अटक केली. पीएसआय निसार शेख, महिला पीएसआय मोरे, पोलीस कॉन्स्टेबल सुयोग सुपेकर, महेश मगर, हेमंत खंडागळे, महिला कॉन्स्टेबल सोनाली भागवत, पोलीस नाईक योगेश घोडके, पोलीस कस्टमर मुकेश क्षीरसागर यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, वैकर याला आज (दि. ५) कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
नगर अर्बन बँकेतून कर्ज घेण्यासाठी खोटी कागदपत्रं सादर करणाऱ्या अनेक कर्जदारांची नावं पोलिसांना मिळाली असून त्या दृष्टीनं पोलीस तपास करत आहेत. अशी बोगस कागदपत्रं सादर करणाऱ्या कर्जदारांवर जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कोट्यवधी रुपयांच्या या आर्थिक घोटाळ्यात तब्बल 105 आरोपींचा समावेश असून आरोपी अटकेच्या भितीनं अनेक जण सध्या फरार आहेत.