मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं आणि सग्यासोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या आणि अशा अन्य मागण्यांसाठी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मराठा समाजाचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची धग कमी होते ना होते, तोच वंजारी समाजातल्या एका युवतीनं आरक्षणाच्या कुबड्या फेकून देत थेट उपशिक्षणाधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. विशेष म्हणजे आरक्षण नाकारण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या संदर्भात त्या तरुणीचे चुलते पोपट आघाव यांनी थोडक्यात माहिती दिली.
ते म्हणाले, ‘आरक्षणातून मुक्त होत खुल्या प्रवर्गातून माझी पुतणी अक्षदा राजू आघाव ईलग हिची MPSC द्वारे उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती झाली. प्रथम PSI नंतर STI आणि आता शिक्षणाधिकारी अशा पोस्ट तिने मिळवल्या आणि अजूनही पुढील पोस्टसाठी तिचा अभ्यास सुरुच आहे.
आरक्षणाच्या भस्मासुराचे खरे स्वरुप लक्षात आल्यानंतर जातीने वंजारी असल्याने सन २०१८ मध्ये उच्च न्यायालयात स्पेशल याचिका दाखल केली आणि आरक्षणातून मुक्तता करुन घेतली. उच्च न्यायालयाच्या निकालामुळे आरक्षणातून बाहेर पडल्याने एक एक पोस्ट तिला मिळत गेल्या. त्याच प्रमाणे अनेक वंजारी मुले चांगल्या चांगल्या पोस्टवर नियुक्त झालेले आपण आज बघत आहोत.
जातीवाचक शब्द प्रयोग वारंवार करणे उचित नाही. मात्र इतर समाज बांधव आपल्या मुलांना आरक्षणासाठी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहेत, ही अतिशय वाईट गोष्ट घडत आहे. दुसरीकडे आत्महत्या केली म्हणून सरकारी मदत मिळवून दिली जात आहे. त्यामुळे मुलं अभ्यास करण्यापेक्षा आत्महत्येला प्राधान्य द्यायला लागली तर अनर्थ ओढवेल.
आरक्षणाचे खरे रुप कळले म्हणूनच आरक्षण त्यागून एवढी वंजारी मुले खुल्या प्रवर्गातून अधिकारी झालेली आजच्या यादीत दिसत आहेत. याचा विचार का नाही केला जात? आरक्षणातून काढून टाकण्यासाठी आम्हाला उच्च न्यायालयाचा आधार का घ्यावा लागला? ज्या बुद्धिमान ब्राह्मणांना आपण मुर्खासारखं वाईट साईट बोलतो, ते आरक्षण का नाही मागत? खरं तर संपूर्ण आरक्षण मुक्तीसाठी जन आंदोलन उभं राहणं, ही काळाची गरज आहे. याचा विचार व्हायला पाहिजे. अक्षदाची जिद्द, चिकाटी आणि अभ्यास याच्या बळावर तिने यश संपादन केले आहे. तिने यावरच न थांबता आणखी पुढचा टप्पा अट्टहास न करता सहजतेनं गाठावा, असेच शुभाशिष या निमित्तानं तिला द्यावेसे वाटतात’.