पालघरः महायुतीचा उमेदवार कोण याची चिंता न करता महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल, त्याचा धडाडीने प्रचार करून त्याला निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या घटक पक्षांच्या बैठकीत करण्यात आला. मनोर येथे याबाबत भाजप, शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट भारतीय रिपब्लिकन पक्ष आदी समविचारी पक्षांची एकत्रित बैठक झाली.
या बैठकीत हा मतदारसंघ कोणाला जातो आणि येथे उमेदवार कोण राहील याची चर्चा करण्यापेक्षा ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि पंतप्रधान कोणाला करायचे आहे. यासाठी आपल्याला मतदान करायचे असल्याने महायुतीचे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून आणू, असा निर्धार या वेळी करण्यात आला.
हे नेते होते उपस्थित
मनोर येथील ‘सायलेंट रिसॉर्ट’ येथे झालेल्या महायुतीच्या या बैठकीला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार आनंद ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमूख कुंदन संखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उमेदवार ठरला, की त्याला निवडून आणू
महायुतीतील घटक पक्षातील कुठलाही उमेदवार दिला तरी आम्ही त्याचा प्रचार करू आणि विक्रमी मताधिक्याने निवडून आणू असा सूर या बैठकीत आळवण्यात आला. या बैठकीनंतर कुंदन संखे म्हणाले, की महायुतीचा उमेदवार कोण असावा याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल. वरिष्ठांनी एकदा निर्णय घेतला, की त्याची अंमलबजावणी आम्ही महायुतीचे सर्व घटक पक्षातील स्थानिक पातळीवरचे नेते कार्यकर्ते एकत्रित येऊन करू.
मोदींच्या पंतप्रधानपदासाठी निवडणूक
उमेदवार कोण असेल आणि कुठल्या घटक पक्षाचा असेल याचा विचार न करता महाराष्ट्रातून लोकसभेला ४५ जागा निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याने आणि देशात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे असल्याने उमेदवार आणि पक्ष गौण मानून काम करू असा निर्धार आम्ही सर्वांनी केला आहे, असे त्यांनी सांगितले.
काम करणाऱ्या नेत्यांकडूनच अपेक्षा
खासदार राजेंद्र गावित यांनी मंत्री, आमदार, खासदार म्हणून कामे केली आहेत. काम करणाऱ्या नेत्यांकडूनच अपेक्षा असते. पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. संसदेत काम करणारा नेता अनुभवी आणि संसदीय प्रथा, परंपरा यांची माहिती असलेला असावा लागतो, असे सांगून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे म्हणाले, की केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास असावा लागतो. जिल्ह्याच्या विकासासाठी कोणकोणत्या ठिकाणाहून निधी मिळवता येतो याची माहिती असावी लागते. ही माहिती खासदार गावित यांना आहे. काम करणाऱ्याकडून कधीकधी अपेक्षापूर्ती होत नसल्याने थोडीशी नाराजी असली तरी ती तात्काळ असते. त्यामुळे खासदार गावित यांच्या विषयी नाराजी असण्याचे काही कारण नाही असे ते म्हणाले
मोदींची विकासाला साथ
नागरी, सागरी आणि डोंगरी अशा तिन्ही विभागात विभागलेल्या पालघर जिल्ह्यात विकासाचे अनेक प्रकल्प खा. गावित यांनी सुरू केले. आता राहिलेल्या प्रकल्पांना मोदी यांची साथ मिळवायचे असेल तर आपल्याला महायुतीचा उमेदवार प्रचंड मतांनी निवडून द्यावा लागेल. पालघर लोकसभा मतदारसंघात अन्य कोणते पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत किंवा उमेदवार कोण आहेत, याचा आम्ही विचार करण्याची गरज नाही. निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे, तसा त्यांनाही तो आहे. यापूर्वी या मतदारसंघात माकपसह अन्य पक्षांनी निवडणूक लढवली आहे. आताही बहुजन विकास आघाडीसह अन्य पक्ष जरी निवडणुकीच्या रिंगणात राहणार असले, तरी ही निवडणूक कोणत्याही स्थानिक प्रश्नांवर नाही तर ती देशाची निवडणूक आहे. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे स्थानिक प्रश्न काय हे या निवडणुकीत फारसे न पाहता देशासमोरचे प्रश्न आणि पंतप्रधान कोणाला करायचे हेच दोन महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीत असतील, असे सांगून पालघर जिल्हा या दोन प्रश्नांभोवती विचार करून महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला
इच्छा असण्यात गैर नाही
शिवसेना तसेच अन्य मित्र पक्षातील सहकाऱ्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे; परंतु एकदा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला, की त्यांच्या निर्णयाची आणि त्यांच्या इच्छेची अंमलबजावणी करणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे असे सांगून संखे यांनी महायुतीच्या घटक पक्षात किंवा त्यांच्या नेत्यात कुठलीही नाराजी नाही असा दावा केला.