अंतरवाली सराटी इथं येत्या काही दिवसांत ओबीसींचंही उपोषण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना शासनाच्यावतीनं सदरच्या उपोषणापासून परावृत्त करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र जशी आम्हाला नोटीस पाठवण्यात आली, तशी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांना पाठविण्यात आली का, असा सवाल हाके उपस्थित करत आपण उपोषणावर ठाम असल्याचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
हाके म्हणाले, ‘अंतरवाली सराटी इथं ६० टक्के ओबीसी समाज आहे. त्यामुळे आम्ही अंतरवाली सराटी इथं उपोषण करणारच आहोत. आम्ही हातात काठ्या – कुऱ्हाडी घेऊन उपोषण करणार नसून शांततेच्या मार्गानं उपोषण करणार आहोत. मात्र आमचं हे आंदोलन दडपणाचा प्रयत्न केला जात आहे’.
दरम्यान, लक्ष्मण हाके यांचं अंतरवाली सराटी इथं उपोषण झालं तर मराठा आणि ओबीसी समाजाचे उपोषण एकाच वेळी या गावात सर्वांना पाहायला मिळणार आहे. या दोन्ही आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.