लोकसभा निवडणुकीसाठी काल (दि. 13) झालेल्या मतदान प्रक्रियेत ठिकठिकाणी चुरशीच्या लढती झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यातल्या बीड जिल्ह्यात अशीच चुरशीची लढत झाली. भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली. यादरम्यान बजरंग सोनवणे यांनी खळबळजनक असा आरोप केला आहे. सोनवणे यांनी म्हटलं आहे, की मतदान प्रक्रिये दरम्यान काही ठिकाणी ईव्हीएम मशीन्स बंद पडल्या होत्या. तर ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे सोनवणे यांचं निवडणूक चिन्हदेखील अस्पष्ट दिसत होतं. सोनवणे यांच्या या आरोपाची निवडणूक आयोगाकडून कशा पद्धतीनं दखल घेतली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुणे, शिरुर, मावळ, बीड, रावेर, जालना, नगर दक्षिण आणि नगर उत्तर (शिर्डी) या मतदारसंघांसह अनेक ठिकाणी लोकसभा निवडणुकीतल्या चौथ्या टप्प्याचं मतदान झालं. या मतदान प्रक्रियेत मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. बीड हा मतदारसंघ पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला आहे. मात्र तो ताब्यात घेण्यासाठी शरद पवार यांनी निकराचे प्रयत्न केले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी पैशांचं वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचं राजकीय भवितव्य काल (दि.१३) ईव्हीएम मशीन्समध्ये बंद झालं.
पुढच्या महिन्यातल्या 4 तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल असल्याने या सर्व संभाव्य खासदारांचं. नशीब पालटलं जाणार आहे. बजरंग सोनवणे यांनी जो आरोप केला आहे, त्या आरोपाचा बीड लोकसभा मतदारसंघावर कितपत परिणाम होतो, हे आता पहावं लागणार आहे.