दिनांक 06/03/2024 रोजी फिर्यादी संतोष काशिनाथ पादीर (वय 32 वर्षे, रा. टाकळी खातगांव, ता. जि. अहमदनगर) यांनी भिस्तबाग परिसरामध्ये बांधकाम कंट्रक्शनचे रुममध्ये ठेवलेले लाईट फिटींगचे वायर बंडल, बोर्ड स्विच, बोर्ड प्लेट, कटर 94,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी रुमचा दरवाजा कशाने तरी तोडून घरफोडी करुन चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 311/2024 भादवि कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश ओला (पोलीस अधीक्षक अहमदनगर) यांनी पोनि दिनेश आहेर (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांना मालाविरुध्दचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते. सदर आदेशानुसार पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/सोपान गोरे, पोलीस अंमलदार संदीप पवार, रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, संतोष खैरे, रणजित जाधव, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करुन आरोपींची माहिती काढुन मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेकामी पथकास सूचना देवुन रवाना केले.
वरील पोलीस पथक दिनांक 09/03/2024 रोजी अहमदनगर शहरामध्ये मालाविरुध्दचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भिस्तबाग महाल परिसरामध्ये संशयित इसम नामे 1) सौरभ ज्ञानेश्वर शेळके (वय 19 वर्षे, रा. तपोवन रोड, समता कॉलनी, अहमदनगर), 2) आदित्य संजय नरोटे (वय 18 वर्षे, रा. तपोवन रोड, राही प्लाझा मागे, अहमदनगर), 3) विधीसंघर्षीत बालक, वय 16 वर्षे असे मिळून आले.
सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याचं सांगितलं. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी व विधीसंघर्षीत बालकांचे ताब्यातून 70,000 /- रुपये किंमतीचे वायरचे बंडल, 23,925/- रुपये किंमतीचे स्विच बोर्डच्या प्लेटा., 7000/- रुपये किंमतीचे लाईटचे स्विच, 3750/- रुपये किंमतीचे कटर मशीन असा एकुण 1,04,675 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
ताब्यातील आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांना मुद्देमालासह तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 311/2024 भादवि कलम 454, 457, 380 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.