जामखेड – (नासीर पठाण) जामखेड तालुक्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली असून तालुक्यातील खर्डा येथील खैरी मध्यम प्रकल्पात पाच टक्के, मोहरी पाझर तलावात ९ टक्के तर भुतवडा तलावात २९ टक्के पाणीसाठा आहे. इतर नऊ तलाव महिनाभरापासून कोरडेठाक पडले आहेत. शासनाने एकुण ३२ गावे ८२ वाडयावस्त्यासाठी २२ टँकरने ६५ खेपाद्वारे माणसी २० लिटर प्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे. वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ६० खाजगी विहीरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यातील १६ विहीरी टॅंकर भरण्यासाठी आहेत. आ. रोहीत पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेकडून जामखेड शहरासह ८२ गावात १०१ टॅंकरने २४० खेपा पाणीपुरवठा सुरू असून मागेल त्याला मुबलक पाणी दिले जात आहे यामुळे जनावरे व नागरीकासाठी दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी पाऊस कमी झाला. मोहरी व खैरी तलावात थोडाफार पाणीसाठा झाला. मराठवाडय़ातील आलेल्या पाण्यामुळे जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव व रत्नापूर, धोत्री तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. धोत्री तलाव गळका असल्याने तो कोरडाठाक पडला आहे तसेच जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव, पिंपळगाव आळवा, जवळके, तेलंगसी, नायगाव, अमृतलिंक तलाव व कोल्हापूर बंधारे महिना भरापासून कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाई जाणवणार निश्चित होते.
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाणीसाठा कमी होत चालले आहे.
जामखेड तालुक्यात शासनाकडून अरणगाव, पारेवाडी, डोणगाव, आघी, कुसडगाव, पाडळी, पिंपरखेड, हळगाव, जवळा, जवळके, नान्नज, चोभेवाडी, खर्डा, राजेवाडी, झिक्री, दिघोळ, जातेगाव, पिंपळगाव उंडा, तरडगाव, मतेवाडी, धोंडपारगाव बावीस कवडगाव खांडवी नाहुली आपटी, देवदैठन, तरडगाव, गावठाण, खुरदैठन, बांधखडक, फक्राबाद, माळेवाडी या ३२ ठिकाणी व ८२ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे.
ग्रामीण भागात माणसी २० लिटर पाणी नियोजन आहे. यामध्ये जनावरांचा समावेश नाही. २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरली जात आहे. प्रशासनापेक्षा दहापट टँकर आ.रोहीत पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था तर विखे यांच्या जनसेवा फौंडेशनच्या वतीने काही ठरावीक गावात पाणीपुरवठा सुरू आहेत. भिषण पाणीटंचाई असताना आ. रोहीत पवार यांनी भरपूर पाणी देऊन
नागरिकांचा रोष कमी केला आहे.
जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावात २९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. शहराचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या पाहता सर्वभागात पाणी मिळण्यासाठी आठ दिवस लागतात. त्यातच जुनी पाईपलाईन असल्याने सतत नादुरूस्त असते. घरोघरी खाजगी बोअर आहेत. तसेच मोफत टँकरने पाणीपुरवठा यामुळे शहरात पाण्याची दाहकता कमी आहे. परंतु नळाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या कुटूंबियांना मात्र पाणि साठवणूक करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
(फोटो – जामखेड तालुक्यात शासकीय टॅंकरन अधिग्रहण केलेल्या खाजगी विहिरीवरून टॅंकर भरले जात आहे)