नगर तालुक्यातल्या निंबळक गावात सिंधुबाई मुरलीधर निकम ही 70 वर्षीय आदिवासी वयोवृद्ध महिला राहते. ऑक्टोबर 2010 ते एप्रिल 2024 या कालखंडामध्ये काही तथाकथित प्रतिष्ठित व्यक्तींनी विविध खरेदीखतांद्वारे या महिलेच्या जमिनीची खरेदी – विक्री फेर खरेदी करण्याचा ‘उद्योग’ केला. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. ग्रामीण विभागाचे डी. वाय. एस. पी. संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरु आहे.
दिनेश भगवानदास छाबरिया, सरला भगवानदास छाबरिया, शिवाजीराव आनंदराव फाळके, आशिष रमेश पोखरणा, जयवंत शिवाजीराव फाळके, आकाश राजकुमार गुरनानी, माणिक आनंदराव पलांडे, अजय रमेश पोखरणा, गौतम विजय बोरा, नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया, तलाठी हरिश्चंद्र देशपांडे, मंडल अधिकारी दिलीप जायभाय आदींसह दुय्यम निबंधक कार्यालयातल्या तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधुबाई निकम या वयोवृद्ध महिलेच्या अशिक्षितपणाचा आणि वृद्धत्वाचा गैरफायदा घेत तिची आर्थिक फसवणूक केल्याचा या सर्वांविरुद्ध आरोप आहे.
न्याय मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करु…!
या संदर्भात ‘महासत्ता भारत’नं ग्रामीण विभागाचे डीवायएसपी संपत भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘पोलीस यंत्रणेवर लोकसभा निवडणुकीचा बराचसा ताण आहे. त्यामुळे महत्त्वाच्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या तपासाला वेळ लागत असला तरी या गुन्ह्याचा व्यवस्थितपणे तपास करून सदर महिलेला न्याय मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल’.