सार्वजनिक जागेवर कचरा टाकू नका. कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी तुमच्या प्रभागात दररोज येते. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना एखादा आढळल्यास तो फोटो फ्लेक्सवर लावून कचरा टाकणाऱ्या ग्रामस्थाला कुप्रसिद्धी देण्याचा अनोखा उपक्रम वडारवाडी ग्रामपंचायतीनं हाती घेतला आहे.
नगर शहराजवळ असलेल्या भिंगारलगतच्या वडारवाडी ग्रामपंचायतीनं हा उपक्रम हाती घेतला आहे. यासंदर्भात विविध ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले असून त्यावर लिहिण्यात आलं आहे, की सार्वजनिक जागेत कचरा न टाकता घंटागाडीतच टाकावा. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी सकाळी साडेसात ते दुपारी दोन या वेळेत प्रभागात विविध ठिकाणी घंटागाडी येत असते.
जर कोणी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध पाचशे रुपये दंड आणि त्याचा फोटो काढून तो फ्लेक्सवर लावण्यात येईल. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीने सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत.
आपला परिसर आणि गाव स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असं आवाहन या फ्लेक्सच्याद्वारे करण्यात आलं आहे वडारवाडी ग्रामपंचायतीने हाती घेतलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतूक होत आहे.