तुमच्या मोबाईलचा रिचार्ज संपला की लगेच तुमच्या मोबाईलची इंटरनेट सेवा बंद पडते. त्यानंतर तुम्हाला नवीन सेवेचा आनंद घेण्यासाठी पुन्हा रिचार्ज मारावा लागतं. अर्थात तुमच्या मोबाईलचा बॅलन्स संपल्याची सूचना तुम्हाला दोन-तीन दिवस आधीच येते. आता मोबाईलचा रिचार्ज संपल्यानंतर जशी इंटरनेट सेवा बंद पडते तशाच प्रकारे तुमच्याकडे रिचार्ज संपलं की तुमच्या घरातला वीज पुरवठा खंडित होणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर यापुढे वीज पुरवठा देखील रिचार्ज मारल्यानंतरच केला जाणार आहे तर मग ही सेवा कधीपासून आणि कुठे लागू होणार हे जाणून घेण्यासाठी ही बातमी सुरवातीपासून शेवटपर्यंत वाचा.
महावितरण कंपनी राज्यभरात लवकरच स्मार्ट प्रीपेड मीटर बसविणार आहे. त्यापूर्वी 2 कोटी 81 लाख वीज ग्राहकांचे सध्याचे जुने मीटर्स काढण्यात येणार आहेत. प्रथमतः शासकीय कार्यालय आणि वसाहती या परिसरामध्ये ही नवीन प्रीपेड मीटर्स लावण्यात येणार आहेत. 15 मार्च 2024 पासून मुंबई आणि परिसरात या कामाला सुरुवात होणार आहे. राज्यातल्या चार खासगी कंपन्यांना हे काम देण्यात आला असून यामध्ये अदानी, एनसीसी, मोंटे कार्लो आणि जीन्स या कंपन्यांचा समावेश आहे.
मुंबई आणि परिसरातल्या वीज ग्राहकांना यापुढे मोबाईल प्रमाणेच हे विजेसाठीच रिचार्ज मारावं लागणार आहे. किती वीज वापरली, याची माहिती मोबाईल ॲपमध्ये ग्राहकांना पाहता येणार आहे. वीज वापरासाठीचे पैसे कुठूनही आणि कधीही भरता येणार आहेत. यामुळे विजेचा वापर कमी अथवा जास्त करता येणार आहे. प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये भरलेले पैसे संपले की वीस पुरवठा खंडित होणार आहे. वीज वापराची आणि आपले किती पैसे उरले याची माहिती आधीच मोबाईलवर वीज ग्राहकांना मिळणार आहे. घरबसल्या मोबाईल ॲपमधून ऑनलाईन पैसे भरता येणार आहेत. ग्राहकांना अचूक देयके म्हणजे बिलं मिळणार आहेत. महावितरण कंपनीने हा प्रयोग फक्त मुंबई आणि परिसरापुरताच न करता पूर्ण राज्यभर राबवावा, अशी मागणी या निमित्तानं केली जात आहे.