अहिल्यानगर जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाचा लागोपाठ दुसऱ्या दिवशी अपघात…
श्रीरामपूर तालुक्यात उसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू; RTO साहेब तुमचं भरारी पथक नेमकं करतंय काय?
श्रीरामपूर – तालुक्यातील हरेगाव-उंदिरगाव रस्त्यावर उसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव-उंदिरगाव रोडवर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची संजय ससाणे (वय ५१) या इसमास धडक बसल्याने त्यात ते जखमी झाले. या अपघातात ससाणे यांच्या डोक्याला व पायाला जबर मार लागला होता. त्यांना तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. परंतु येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.
साखर कारखान्यांसाठी उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रक हे मर्यादेच्या पलीकडे माल भरतात. कधीकधी एका ट्रॅक्टरला दोन-तीन ट्रॉल्या देखील जोडल्या जातात. ट्रक कलंडायला लागेपर्यंत भरला जातो. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अशाप्रकारे निष्पाप लोकांचा बळी त्यामध्ये जात आहे. दरम्यान श्रीरामपूर शहरातच आरटीओचे कार्यालय आहे, मग हे आरटीओचे अधिकारी कर्मचारी नेमकं करतंय काय? त्यांना ही बेकायदेशीर वाहतुक दिसत नाही का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे.
कालच अहिल्यानगर शहरातील उड्डाणपुलावर उसाने भरलेला ट्रक पुलाच्या कठड्यावर पलटी झाला. ट्रक मधील वरपर्यंत भरलेला ऊस थेट पुलावरून खाली रस्त्यावर पडला व ट्रक उड्डाणपुलाच्या कठड्याला अडकला. सुदैवानं रस्त्यावर खाली वाहन नव्हते अन्यथा मोठी जीवित व वित्त हानी झाली असते.
विशेष म्हणजे हा अपघात नगर शहरातील आरटीओ कार्यालयाच्या अगदी समोर झाला. त्यामुळे जिल्ह्यातील आरटीओ चे भरारी पथक नेमकं काय करतचं असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आरटीओ चे अधिकारी कुठल्याही अपघाताची जबाबदारी शहर वाहतूक शाखेवर टाकून मोकळे होतात. मग आरटीओ अधिकाऱ्यांची जबाबदारी काय?
जर अश्या प्रकारे आरटीओ च्या निष्काळजी पणामुळे अपघातात लोकांचे बळी जात असेल तर जिल्ह्यातील आमदारांनी अधिवेशनात हा प्रश्न मांडावा अशी मागणी आम्ही महासत्ता भारत न्यूज च्या वतीने करत आहोत.