नगरच्या महापालिकेत काही वर्षांपूर्वी ‘मोठ्ठा’ चमत्कार स्थानिक नागरिकांना पहायला मिळाला होता. त्यावेळी एक नव्हे तर चक्क दोन दोन महापौर या महापालिकेला मिळाले होते. संदीप कोतकर आणि दीप चव्हाण असे ते दोन महापौर. एक महापौर हे महापौरांच्या अलिशान वातानुकूलित दालनात बसून काम करत होते. दुसरे महापौर चक्क महापालिकेबाहेर मंडप टाकून तात्पुरत्या कार्यालयात कामकाज पाहत होते. एक महापौर लाल दिव्याच्या गाडीत फिरत होते तर दुसरे महापौर सायकलला लाल दिवा लावून फिरत होते. मोठी गंमतच त्यावेळी नगरकरांना पाहायला मिळाली होती.
हे सारं आत्ताच आठवायचं कारण असं, की नगरमहापालिकेला अवघ्या दोनच दिवसांत दोन आयुक्त मिळाले आहेत. पहिले आयुक्त देविदास पवार यांची नियुक्ती झाल्याचं पत्र राज्याच्या नगर विकास खात्यानं महापालिकेला पाठवलं तर दोनच दिवसानंतर यशवंत डांगे यांची नगरच्या महापालिकेत आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचं पत्र आज (दि. 10) रोजी महापालिकेला प्राप्त झालं. अवघ्या दोन दिवसांत दोन आयुक्त देणाऱ्या राज्याच्या नगर विकास खात्यात नक्की काय चाललंय तरी काय, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे.
नगरचे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांचा संताप… !
दरम्यान, या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नगरचे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी संताप व्यक्त केला आहे. याविषयीचा खुलासा करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे. ते म्हणताहेत, की दि. 8 जुलै रोजी राज्याच्या नगर विकास विभागानं सेवाज्येष्ठतेचा निकष पूर्ण करणारे मुख्य अधिकारी देविदास पवार यांची आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. परंतू दि. 10 जुलै रोजी आदेश काढून यशवंत डांगे यांची अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्तीचं पत्र दिलंय.
वास्तविक पाहता कोणतीही प्रशासकीय बदली करण्यापूर्वी आस्थापना मंडळ त्याचे अध्यक्ष हे नगर विकास विभागाचे प्रधान सचिव व सदस्य संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय तसेच प्रधान सचिव 1 ही सदस्य असतात. हे आस्थापना मंडळासमोर प्रस्ताव सादर करतात. त्यानंतर त्यांनी त्याची छाननी करून सक्षम प्राधिकरण यास शिफारस करायची असते.
संबंधित अधिकारी बदली करण्यास पात्र आहे किंवा कसे, हे पाहिलं जातं. मात्र या प्रकरणात दोनच दिवसांत प्रस्ताव सादर होऊन नगर विकास विभागाचे अवर सचिव, सहसचिव, प्रधान सचिव यांची स्वाक्षरी झाल्यानंतर नगर विकास खात्याचे मंत्री यांची स्वाक्षरी आणि त्यानंतर मुख्यमंत्री यांची मान्यता घेऊन आदेश पारित करावे लागतात.
या प्रकरणात विधानसभेचं अधिवेशन सुरु असताना नगर विकास विभागानं इतक्या तातडीनं संपूर्ण प्रक्रिया राबवून पवार यांची बदली रद्द करुन त्यांच्या जागी डांगे यांची नेमणूक केली आहे. यावरुन नगर विकास विभागात नक्की काय चाललंय, हे समजायला तयार नाही.
पवार यांना नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या प्रशासकीय अनुभव 22 वर्षांचा आहे. डांगे यांना आयुक्त म्हणून कोणताही अनुभव नसताना पवार यांची बदली रद्द करावी, असं शासनाला का वाटलं, याचा खुलासा करणं आवश्यक आहे, असं मत सामाजिक कार्यकर्ते
शाकीर शेख यांनी व्यक्त केलं आहे.