अहमदनगर मनपा चे आयुक्त यशवंत डांगे उतरले गटारीत.. उड्डाणपुलाखाली स्वच्छता अभियान
नगर : महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून आयुक्त यशवंत डांगे यांनी शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. तसेच डेंग्यू मुक्त नगर शहरासाठी देखील त्यांनी “एक तास स्वच्छतेसाठी” असे आवाहन नगरकरांना करून दर रविवारी विषाणूजन्य आजार जनजागृती मोहीम ते राबवीत आहेत. शनिवार दि ३१ आँगस्ट व रविवारी दि १ सप्टेंबर रोजी दोन दिवस महापालिकेच्यावतीने स्टेट बँक चौकापासून ते सक्कर चौकापर्यंत उड्डाणपुलाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
त्यावेळी उड्डाणपूलाखालील एका रोड साईड गटारीत आयुक्त यशवंत डांगे हे स्वतः उतरुन साफसफाई करत असल्याचे पाहून महापालिका कर्मचारी तसेच तेथील नागरिक आश्चर्यचकित झाले. गटारीत साचलेला कचरा, प्लास्टिक, दगड – गोटे, माती इ संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. उड्डाणपुलाच्या खांबांवर शिवचरित्र रेखाटण्यात आलेले आहे. तेथे देखील स्वच्छता करण्यात आली. रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत काढण्यात आले. डिव्हायडर जवळ साचलेली माती संकलित करण्यात आली. बस स्थानकाजवळ उघड्यावर कचरा टाकणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांना नोटीसा बजाविण्यात आल्या तसेच दंड देखील करण्यात आला.
उड्डाणपुलाखालील अनधिकृत फ्लेक्स बोर्ड जाहिरात फलक हटविण्यात आले. या मोहिमेत महापालिका घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे तसेच स्वच्छता कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील विविध भागात दर शनिवारी स्वच्छता अभियानात महापालिका आयुक्त यशवंत डांगे हे स्वतः सहभागी होऊन स्वच्छता करत असल्याने महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना व नगरकरांना एक सकारात्मक संदेश यामुळे मिळत आहे.